अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) व प्रिया बापट (Priya Bapat) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. नुकताच उमेश कामतने वाढदिवस साजरा केला. आता या वाढदिवसाच्या निमित्ताने उमेश कामतने काय करायचे ठरवले आहे, हे प्रिया बापटने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

काय म्हणाला उमेश कामत?

अभिनेत्री प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया व उमेश प्रवास करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रिया उमेशला विचारते, “तुझा वाढदिवस कसा चाललाय?”, यावर उमेशने म्हटले, “कमाल. या वाढदिवसाला एक ठरवलं आहे, एक्स्प्रेस व्हायचं. एक्स्प्रेस करायचं. प्रियाची खूप इच्छा आहे, मी कमी व्यक्त होतो; तर मी या वाढदिवसापासून ठरवलंय की मी व्यक्त होणार. आता बघाच मी कसा व्यक्त होतो. प्रियाने सकाळपासून जे काही लाड केलेले आहेत, काल रात्री केक बनवला. इतका केक कमाल बनवला की ओव्हनच बंद झाला. यानंतर केक बनवायचा नाही कोणीही, त्यासाठी नवीन ओव्हन घेऊन यायचा, असे माझे लाड चालले आहेत. तर मी प्रियाला रिटर्न गिफ्ट देणार आहे ते म्हणजे मी व्यक्त होणार आहे.” त्यांच्या या संवादादरम्यान दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत.

प्रिया बापट व उमेश कामत हे सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या जोडीबरोबर अभिनेता आशुतोष गोखले व अभिनेत्री पल्लवी पाटील हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक होताना दिसत आहे. याबरोबरच, प्रिया व उमेश मराठीसह हिंदी वेब सीरिज तसेच चित्रपट यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

चित्रपटांबरोबरच अभिनेत्री गाण्यांच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली गाणी चाहत्यांना आवडत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री इंडियन ओशन कॉन्सर्टमध्ये गाताना दिसली होती. याबद्दल आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर केल्याचे पाहायला मिळाले. प्रियाने गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत उमेशने त्यावर हार्ट इमोजी देत बायकोचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: ‘आई कुठे काय करते’ नंतर मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते? अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

आता प्रिया बापट व उमेश कामत कोणत्या नवीन चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader