केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. आता या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार, याचे गुपित समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘गडकरी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले होते. या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरा उभा असून तो हातात हात घालून उभा आहे, असे दिसत होते. तसेच टीझरमध्येही नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल खुलासा झाला नव्हता. यामुळे प्रेक्षकांमध्ये कायम उत्सुकता पाहायला मिळत होती.
आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
अखेर या चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार, याचे उत्तर समोर आले आहे. अभिनेता राहुल चोपडा हा या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात त्याचा पहिला लूकही समोर आला आहे.
या चित्रपटाच नितीन गडकरींच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. याबरोबरच या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख झळकणार आहेत. तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
दरम्यान ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.