गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची यशोगाथा सांगण्यात आली होती. आता लवकरच शिवाजी महाराजांचे विश्वासू शिलेदार बहिर्जी नाईक जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बहिर्जी’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरवर ‘सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय… ‘ अशी टॅगलाइन लिहिली आहे. ‘बहिर्जी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शिवप्रेमी आणि ऐतिहासिक चित्रपटाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

‘बहिर्जी’च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात बहिर्जींची भूमिका कोण साकारणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून व शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती दिग्दर्शक राहुल जाधव यांनी दिली.

हेही वाचा- मोहन आगाशे, तेजश्री प्रधान अन्…; मराठी कलाकारांची फौज असलेल्या ‘लोकशाही’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

कोण होते बहिर्जी नाईक?

बहिर्जी नाईक हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर होते. त्या काळातील १४ प्रांतांतील सर्व बोली मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत होत्या. वेषांतर करण्यात त्यांचा हातखंडा होता. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत बहिर्जी नाईक यांची मोलाची भूमिका होती. त्यांच्यातले कसब ओळखून शिवाजी महाराजांनी त्यांना गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. मात्र, त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.

Story img Loader