विविधकालीन प्रसंग पाहताना अक्षरश: अंगावर येणारा काटा, मनाला भिडणारे संवाद, आपसूकच डोळ्यात येणारे पाणी आणि नसानसांत भिनणाऱ्या गर्जना पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत घुमणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या रूपेरी पडद्यावर पुन्हा ऐतिहासिक वातावरण पाहायला मिळणार आहे. भक्ती आणि शौर्याचा संगम असलेले विविध ऐतिहासिक मराठी चित्रपट २०२५ या वर्षात रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि एकूणच शिवकालीन काळ प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ या मराठी चित्रपट शृंखलेच्या माध्यमातून मांडला आहे. या मालिकेतील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि शिवरायांचा छावा या सहाही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आणि ‘आनंदडोह’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताबाईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात होण्यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

तसेच जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवर आधारित योगेश सोमण लिखित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘आनंदडोह’ हा चित्रपट डिसेंबर २०२५ महिन्यात प्रदर्शित होणार आहे. संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडल्यापासून ते तरल्यापर्यंतच्या दिवसात संत तुकाराम महाराज, त्यांचे कुटुंब, संपूर्ण तत्कालीन समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक या सगळ्यांवर काय परिणाम झाला याची कथा ‘आनंदडोह’ चित्रपटात मांडण्यात आली आहे.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवणाऱ्या रणझुंझार मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी : पुरंदरची यशोगाथा’ या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी व प्रेरणादायी इतिहास मांडणारा हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सौरभ राज जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि अंकित मोहन याने मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.

प्रेमपट, हास्यपट आणि थरारपटांच्या पलीकडे जाऊन ऐतिहासिक मराठी चित्रपटांनीही तिकिट खिडकीवर यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच या चित्रपटांची विशेष चर्चाही मनोरंजनवर्तुळात रंगली. त्यामुळे २०२५ या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राजा शिवाजीचित्रपटात रितेश देशमुख

हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख याने भारतीय मनोरंजनसृष्टीत स्वत:चा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट २०२५ या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. रितेशने ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते, या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत सर्वांसमोर येत असून या चित्रपटाला नेमका कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ऐतिहासिक चित्रपटांची अभ्यासपूर्ण निर्मिती आवश्यक

ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करताना मी मोह टाळतो आणि सत्यता जपून अधिकाधिक ऐतिहासिक दाखले देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट आपलेसे व खरे वाटतात, या गोष्टी जुळवून आणल्यामुळे माझ्या आजवरच्या ऐतिहासिक चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडत असतो आणि चित्रपटातील इतिहास व विचार हे भविष्यातील पिढीत संक्रमित होत असतात. परिणामी, युवा पिढी ही वाचनाकडे वळते. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांची अभ्यासपूर्ण निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे, असे स्पष्ट मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.