Upendra Limaye New Bike : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये त्यांच्या बहुरंगी अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेत असतात. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात त्यांनी फ्रेडी पाटील ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. अवघ्या १० मिनिटांचा सीन त्यांनी तुफान गाजवला होता. सोशल मीडियावर सर्वत्र उपेंद्र लिमयेंची चर्चा होती.
‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘चौक’, ‘सावरखेड एक गाव’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय उपेंद्र लिमयेंनी गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुद्धा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या उपेंद्र लिमये वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्याच्या घरी एक नवीन पाहुणी आली आहे. त्यांनी नुकतीच आलिशान BMW स्पोर्ट्स बाईक खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. BMW बाईक खरेदी करण्यासाठी अभिनेते आपल्या मुलाबरोबर गेले होते.
सध्याच्या काळात स्पोर्ट्स बाईची प्रचंड क्रेझ आहे. अशाप्रकारच्या स्पोर्ट्स बाईकवरून लांबचा प्रवास करणं सुद्धा अगदी सोयीचं होतं. “वेलकम BMW G 310 GS!” असं कॅप्शन देत उपेंद्र लिमयेंनी त्यांच्या बाईची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नवीन बाईक पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
उपेंद्र लिमये यांनी खरेदी केलेल्या ‘BMW G 310 GS’ या बाईकची किंमत तब्बल ३.४९ लाख ( एक्स-शोरुम ) असल्याची माहिती ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ने दिली आहे. या बाईकची मुंबईत ऑन रोड किंमत ४ लाखांहून अधिक आहे. आता या आलिशान बाईकवरून अभिनेते रोड ट्रिपसाठी कुठे जाणार हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत.
दरम्यान, उपेंद्र लिमये यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘संक्रांतिकी वास्तुनम’ हा त्यांचा पहिला तेलुगू चित्रपट १४ जानेवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात केलेल्या अभिनयासाठी लेखक-दिग्दर्शक अनिल रवीपुडी यांनी देखील उपेंद्र लिमये यांचं कौतुक केलं होतं.