मराठी अभिनेते उपेंद्र लिमये सध्या त्यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यात त्यांनी फ्रेडी पाटील या शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे. ‘अॅनिमल’मध्ये उपेंद्र यांनी साकारलेल्या या जवळपास १५ मिनिटांच्या भूमिकेचं आज जगभरात कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावर त्यांचे बरेच संवाद तुफान व्हायरल झाले आहेत.
उपेंद्र लिमयेंच्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जोगवा’ चित्रपटातील ‘तायप्पा’च्या भूमिकेचं देखील अशाचप्रकारे कौतुक झालं होतं. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या दोन्ही भूमिकांबाबत उपेंद्र लिमयेंनी नुकत्याच एबीपी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
हेही वाचा : लगीनघाई! गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकरने दिली प्रेमाची कबुली; फोटो शेअर करत म्हणाली, “सिक्रेट सांता…”
उपेंद्र लिमये म्हणाले, “‘जोगवा’मधील ‘तायप्पा’च्या भूमिकेची तुलना कोणाशीही होऊ शकणार नाही. कारण, त्या चित्रपटाची टीम आणि माझी भूमिका ते सगळं वेगळंच होतं. आज माझ्या तायप्पापेक्षा फ्रेडी पाटीलच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली याचं मुख्य कारण म्हणजे ‘जोगवा’ हा प्रादेशिक चित्रपट होता आणि ‘अॅनिमल’ चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. काही अमराठी लोकांनी अलीकडच्या काळात ‘जोगवा’ पाहिलाय. त्यांच्याकडून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. ‘जोगवा’ चित्रपटाला प्रादेशिकतेच्या मर्यादा होत्या. फ्रेडीला असं कोणतंच बंधन नाही.”
उपेंद्र पुढे म्हणाले, “फ्रेडीला एवढा प्रतिसाद मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. तीन दिवस मुलाखती सुरू असल्याने माझ्या संपूर्ण घराचा स्टुडिओ झाला होता. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील काही डिजिटल प्लॅटफॉर्मकडून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. एवढं भयानक यश मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं.”
हेही वाचा : मुहूर्त ठरला, मंडप सजला! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई, शेअर केला मेहंदी सोहळ्यातील फोटो
“हे यश पाहून एक कलाकार म्हणून त्रास होतो. जर एवढं यश त्यावेळी तायप्पाला मिळालं असतं, तर काय मजा आली असती हे शब्दात नाही सांगता येणार…असं एक कलाकार म्हणून मला नक्कीच वाटलं.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.