अभिनेते उपेंद्र लिमये सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु, लिमयेंच्या १० मिनिटांच्या सीनने सध्या एक वेगळीच हवा निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या एन्ट्रीला चित्रपटगृहांमध्ये एक वेगळाच माहोल तयार होतो. रणबीरला शस्त्रसाठा पुरवणारा फ्रेडी पाटीलच्या भूमिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अनेक चित्रपट समीक्षकांनी उपेंद्र लिमयेंच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं आहे. आज त्यांनी मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली असली, तरीही यशाचा हा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला. यादरम्यान उपेंद्र यांची पत्नी स्वाती लिमयेंनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. अभिनेत्याने नुकत्याच लेट्स अप मराठीला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील संघर्ष व कुटुंबीयांबद्दल सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपेंद्र लिमये म्हणाले, “माझ्या प्रोफेशनल करिअरची सुरूवात वयाच्या तिशीनंतर झाली. त्याआधी मी फक्त समांतर चित्रपट आणि प्रायोगिक रंगभूमी एवढंच करत होतो. पुढे, व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून काम करायचं की अभिनेता म्हणून हे माझं नक्की नव्हतं. कारण, थिएटर करताना या दोन्ही (अभिनय व दिग्दर्शन) गोष्टी मी करत होतो. पुढे, विनय आपटेंच्या एका नाटकामुळे मला चांगली संधी मिळाली. माझी सर्वात गुणी मैत्रीण रसिका जोशी तिच्या हट्टाखातर मी ते नाटक केलं होतं. आज ती आपल्यात नाहीये. त्या नाटकाच्या जाहिरातींमुळे मी व्यावसायिक नाटक करतोय ही गोष्ट माझ्या मित्रमंडळींना समजली.”

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’मध्ये मराठी संवाद का होते? उपेंद्र लिमयेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “संदीपला मी…”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “त्या नाटकानंतर सुदैवाने मला फारसा संघर्ष करावा लागला नाही. अनेक कामं स्वत:हून आली. आयुष्यातील प्रत्येक संघर्ष मी सुरुवातीपासून हसत-हसत स्वीकारला. राहायची सोय नव्हती, प्रवास करण्याची भ्रांत असायची. पण, कलाकार त्या नशेत असतो त्याला काहीच कळत नसतं. प्रत्येक गोष्ट तो हसून, आनंदी राहून स्वीकारतो. या काळात माझ्या कुटुंबाने मला प्रचंड साथ दिली. माझ्या संघर्षाची सर्वाधिक झळ माझ्या कुटुंबाला बसली. हे मी नेहमीच मान्य करेन.”

हेही वाचा : “पवई ते अंधेरी चालत जायचो”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सांगितला कठीण प्रसंग; म्हणाला, “१५० रुपये…”

“माझ्या बायकोने (स्वाती लिमये) मला खरंच खूप साथ दिली. तिची भक्कम साथ नसती, तर मी काहीच करू शकलो नसतो. माझ्या अनेक मित्रांचं आयुष्य त्यांच्या जोडीदारामुळे अवघड झालेलं मी पाहिलंय. कोणत्याही भौतिक गोष्टींमुळे माझ्या करिअरवर परिणाम होऊ नये किंवा मला आर्थिक समस्या उद्भवू नयेत म्हणून माझ्या पत्नीने मला अनेक गोष्टी सांगितल्याच नव्हत्या. ‘जोगवा’साठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, मुंबईत मी स्वत:चं घर घेऊ शकलो नव्हतो. घर घ्यायचं, तर हप्ता आला आणि तो हप्ता भरण्यासाठी जर मला नको ते काम करायला लागलं, तर त्याचा मला त्रास होईल असं मी एकदा तिला सांगितलं होतं. यावरून ती म्हणाली, आपण भाड्याच्या घरात राहूया. पण, तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे. मला मुंबईत घर किंवा गाडी पाहिजे असं काहीच नाही. या गोष्टींमुळे तुला प्रेशर येणार असेल, तर आपण जे आहे त्यात सामावून घेऊ. या गोष्टी आता बोलण्यासाठी सोप्या आहेत. पण, तेव्हा हे सगळं प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी तिने मोठं धाडस दाखवलं.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.