Urmila Kothare First Post After Car Accident : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा २८ डिसेंबरला अपघात झाला होता. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. यावेळी उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती. या अपघातात अभिनेत्री सुद्धा गंभीर जखमी झाली होती. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्री रुग्णालयातून घरी परतली असून, तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, घडलेल्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उर्मिलाने देवाचेही आभार मानले आहेत.
उर्मिला कोठारे पोस्ट शेअर करत लिहिते, “२८ डिसेंबर २०२४ रोजी, रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. कांदिवली पोईसर मेट्रो स्टेशनजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचं काम सुरू असताना, मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर वाहने उभी होती. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. अचानक वळण आलं, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं.”
“मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार, ज्यांनी तात्काळ आम्हाला मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात दाखल केलं. आता मी माझ्या घरी आहे. माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अजूनही दुखापत आहे…थोडा त्रास होतोय. यामुळेच डॉक्टरांनी मला किमान ४ आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी माझ्या प्रकृतीसाठी आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली. हा एक भीषण अपघात होता आणि यामुळेच पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल.” असं उर्मिलाने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, उर्मिला कोठारेच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी व तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय अभिनेत्रीने ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘काकण’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.