Urmila Nimbalkar : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे मनोरंजन विश्वातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करीत मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. आस्ताद काळे, प्रसाद ओक, तेजश्री प्रधान, रसिका वेंगुर्लेकर यांच्याप्रमाणेच इतरही बऱ्याच कलाकारांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर तीव्र संताप व्यक्त केला होता. अशातच आता अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर हिने पोस्ट केलेल्या स्टोरीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन चिमुकल्या मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार. बदलापूरचं प्रकरण ताजं असतानाच राज्याच्या विविध भागांतून महिलांवर होणाऱ्या बलात्कार आणि हत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
या सगळ्या प्रकरणावर ऊर्मिलानं (Urmila Nimbalkar) इन्स्टाग्रामवर स्टोरीशी संबंधित एक फोटो पोस्ट केला. हा फोटो एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्ताचा आहे. त्यात असं म्हटलं आहे की, १५१ आमदार आणि खासदारांनी महिलांवर होणाऱ्या विविध अत्याचारांच्या घटनांबद्दल सांगितलं आहे. त्यात बलात्काराच्या १६ गुन्ह्यांचा समावेश आहे. या सगळ्या प्रकरणावर ऊर्मिलानं सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली ऊर्मिला निंबाळकर?
महिला अत्याचारांविरोधात राग व्यक्त करीत ऊर्मिला म्हणते की, ही संपूर्ण पोस्ट वाचल्यावर लक्षात येतं की, आपण कोणाला मतदान करतो? सोशल मीडियावर त्रागा व्यक्त करणं, मेणबत्त्या लावणं, सर्व पुरुषवर्गाला शिव्या घालणं यापेक्षा आपलं मत नक्की कोणाला जातं? आपल्या आसपासच्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं जनजागृती करण्यासाठी आपलं योगदान काय असावं? यावर विचार व्हावा, अशा तीव्र शब्दांत ऊर्मिलानं महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तिचं मत मांडलं आहे.
निवडणुकीनंतर सत्ता पालटते, सरकार बदलतं; मात्र तरीसुद्धा स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. ज्या देशात स्त्रियांना परस्त्री मातेसमान असल्याची वागणूक मिळते, ज्या देशात स्त्रियांना देवीचा मान दिला जातो; त्या भारतात, त्या महाराष्ट्रात महिलांची अब्रू सर्रासपणे लुटली जाते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशा स्वरूपाच्या शब्दांत सोशल मीडियावर कलाकारांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.