मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय घराणं म्हणजे शिंदेशाही घराणं. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाही घराण्याचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आजही शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय आणि वाखण्याजोग असं योगदान शिंदे घराण्याचं आहे. याचं शिंदेशाही घराण्यातील लाडक्या लेकीचा नुकताच मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. यासंदर्भात अभिनेता, गायक, संगीतकार उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे; जी सध्या व्हायरल झाली आहे.
स्वरांजली मिलिंद शिंदे असं या शिंदे घराण्यातील लाडक्या लेकीचं नाव आहे. नुकताच तिचा मोठ्या थाटामाटात शाही लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ उत्कर्ष शिंदेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व भावंडं भावुक होऊन बहिणीला निरोप देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे, “१० भावांची एक बहीण. कर्तृत्ववान, सहनशील, समजूतदार, मायाळू, लहानपणापासून सगळ्यांना जीव लावणारी आमची ‘ताई’. लग्नात हजारो शुभचिंतक जरी होते तरी आमची काकू ज्योती मिलिंद शिंदे यांची आम्हाला खूप आठवण आली. करोनामध्ये ती आम्हा सर्वांना सोडून गेली. काकूच्या नंतर सर्वात लहान असून ताईने आईची जागा घेत भावांना, काकाला प्रेमाने सांभाळलं. खऱ्या अर्थाने भावांचं नाक उंच ठेवणारी आमची ताई. सक्षम, संवेदनशील, परिपक्व विचारांची, आमची मैत्रीण तर कधी काकू तरी कधी आमच्या आजीच रुप घेणारी आमची ताई. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. कधीच टेन्शन घेऊ नकोस तुझे भाऊ नेहमी तुझ्याबरोबर आहेत.”
उत्कर्षच्या या पोस्टवर आदर्श शिंदेने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलं आहे, “स्वरांजली कालचा दिवस हा फक्त तुझा होता. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत असताना, तुझे भाऊ तुझ्या या प्रवासातही नेहमी तुझ्याबरोबर आहेत. तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुझं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे असो हिच प्रार्थना.” उत्कर्षच्या या पोस्टवर शिंदेशाही घराण्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देऊन स्वरांजलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे. तसंच अलीकडेच त्याचं गौतमी पाटीलबरोबरचं ‘आलं बाई दाजी माझं’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं.