लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाही घराण्याने आपल्या दमदार आवाजाने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. शिंदेशाही घराण्याचा चाहता वर्ग महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी सिनेसृष्टीत शिंदेशाहीचं उल्लेखनीय आणि वाखण्याजोग योगदान आहे. आज शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदर्शचा भाऊ उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
आदर्श शिंदेने आपल्या जबरदस्त आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठीबरोबर आदर्शने बरीच हिंदी गाणी गायली आहेत. लहान वयातचं संगीताचे धडे घेऊन आदर्श शिंदे सध्या मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा गायक आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारांपासून अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आलं आहे. अशा या प्रसिद्ध गायकाचा आज वाढदिवस आहे.
अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर करत आदर्शला शुभेच्छा दिल्या आहेत. उत्कर्षने लिहिलं, “माणसं जन्म घेतात आणि आयुष्यभर वर्तमानात स्वतःचं नाव करण्यात घालवतात. पण काही जन्म घेतात पिढ्यान पिढ्यांचा उधार करायला. कुळाच नावं भविष्यावर कोरायला, समाजाची मान उंचावायला. आई-वडिलांचा, गुरुंचा, महापुरुषांचा अभिमान वाढवायला आणि स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला, स्वप्न पूर्ण फक्त अतोनात मेहनतीने होतात, याची जाणीव करून द्यायला. तुझा आदर्श जगाने घ्यावा आणि तुझ्यासारखा भाऊ घरोघरी जन्म घ्यावा…तुझा वाढदिवस म्हणजे शिंदेशाही परिवाराचा सुरेल सोनेरी दिवस…तुला माझे आयुष ही लागो…भावा, खूप सारं प्रेम. असाच हसत राहा आणि अशीच प्रगती करत राहा.”
उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टवर आदर्शने हार्ट इमोजी देऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसंच चाहत्यांनी आदर्शला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “आपल्या बुलंद आवाजाने आंबेडकरी चळवळ घराघरात पोहोचविणारा, कुठलाही भेदभाव न करता महापुरुषांची महती सांगून समाज प्रबोधन करणारा, आपला आवाज सातासमुद्रापार नेणारा आणि आजच्या तरुणाईला आपल्या आवाजाने भुरळ पाडणारा शिंदेशाहीचा बुलंद आवाज महाराष्ट्राची आन बाण शान आदर्श आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “माझ्या समाजाचा मान ज्याच्यावर आहे, सर्वांना अभिमान अशा महागायकाला वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा.”
दरम्यान, उत्कर्ष शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रकाश झोतात आला. लवकरच तो महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे. तसंच ‘२२ मराठा बटालियन’ या चित्रपटातही उत्कर्ष झळकणार आहे.