लोकप्रिय गायक, संगीतकार, अभिनेता उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या आगामी कामाविषयी चाहत्यांना माहीत देत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याची अनेक नवनवीन गाणी पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष कामा व्यतिरिक्त आजूबाजूच्या घडामोडींविषयी सोशल मीडियावर परखड मत व्यक्त करत असतो. नुकतीच त्यानं वडील आनंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं सुंदर पोस्ट लिहिली आहे.

लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाही घराण्यानं आपल्या दमदार आवाजानं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शिंदेशाही घराण्याचा चाहता वर्ग महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी सिनेसृष्टीत शिंदेशाहीचं उल्लेखनीय आणि वाखण्याजोग योगदान आहे. आज शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने उत्कर्षने आनंद शिंदे यांचे तरुणपणातील काही फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्कर्ष शिंदेने लिहिलं की, हॅपी बर्थडे पप्पा. निसर्ग काही गोष्टी जगा वेगळ्या बनवतो, त्याचं एक उदाहरण म्हणजे तुमचा आवाज. ज्या वयात माणसं रिटायरमेंट घेतात त्या वयात तुम्ही बुंगाफाईट सारखं गाणं देऊन तुम्ही एव्हरग्रीन आहात हे सिद्ध केलंत. फॅन्स, फॉलोवर्स सर्वांचे असतात. पण तुमचे चाहते तुम्हाला आळवावरच्या दवबिंदू सारखं झेलतात. काल, परवा तुमचा आवाज बसला आणि मी परफॉर्म केलं. माणसं नाचली, धमाल मजा केली. तुम्ही फक्त बसून होतात तरीही स्टेज भरून होता. तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. भारताला आनंद शिंदे अजून ऐकायचे आहेत. तुम्हाला माझं आयुष लागो..मजेत राहा, आनंदी राहा.

दरम्यान, उत्कर्ष शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रकाश झोतात आला. अलीकडेच त्याची ‘म्हातारं नाचतय टनाटना’, ‘आपला दिवाळी दसरा काय? भीम जयंती हाय’, ‘बुलेटवर झेंडा निळा’, ‘हळदीचा सोहळा’ अशी बरीच गाणी प्रदर्शित झाली. लवकरच तो महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे. तसंच ‘२२ मराठा बटालियन’ या चित्रपटातही उत्कर्ष झळकणार आहे.