अभिनेते वैभव मांगले सध्या त्यांच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहेत. आजवर त्यांनी असंख्य नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा समाजात घडणाऱ्या सद्य स्थितीवर किंवा सामाजिक विषयांवर वैभव मांगले आपलं स्पष्ट मत मांडत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
देशातील सिनेसृष्टीत सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली हिंसा व बोल्ड सीन्समुळे अनेकांनी या ‘अॅनिमल’वर टीका केली आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे तर काही चित्रपट समीक्षक व कलाकारदेखील चित्रपटाच्या एकंदर आशयावर टीका करत आहे. अशातच मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “कौतुक केलं म्हणजे कोणाचा भक्त झालो का?” नाना पाटेकरांचा सवाल; म्हणाले, “कोणत्याही पक्षाची…”
वैभव मांगलेंनी त्यांच्या पोस्टद्वारे, “‘अॅनिमल’ आणि ‘अल्फा मेल’ या दोन गोष्टींआडून अनेक गोष्टींचे समर्थन दिग्दर्शकाने केले आहे जे खूप घातक आहे. (उदा. हिंसा आणि लैंगिकता) असे वाटते का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी! थाटामाटात पार पडला स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीचा लग्नसोहळा, फोटोंनी वेधलं लक्ष
एका युजरने या पोस्टवर, “हो नक्कीच घातक आहे. कारण, नुकत्याच तारुण्यवस्थेत पदार्पण केलेल्या मुला-मुलींसाठी असे चित्रपट घातक आहेत.” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी काही युजर्सनी यावर, “आजही समाजात अशीच मानसिकता आहे”, “सेन्सॉरने मान्यता कशी दिली”, “गन्हेगारीस प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. याउलट काही युजर्सनी चित्रपटाच्या एकंदर कथेचं समर्थन केलं आहे.