अभिनेता वैभव तत्त्ववादी हा ‘सुराज्य’, ‘महाराज’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘चीटर’, ‘त्रिभंगा’, ‘कान्हा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘आर्टिकल ३७०’ अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो.

आजपर्यंत वैभव तत्त्ववादीने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारीत, तसेच मराठीसह बॉलीवूडमध्ये काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर अभिनेता सक्रिय असतो. तो अनेकदा शायरी सादर करतानाही दिसतो. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो डान्स करताना दिसत आहे.

‘आली ठुमकत नार लचकत’ गाण्यावर वैभव तत्ववादीचा ‘या’ अभिनेत्रीसह डान्स

वैभव तत्त्ववादीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आली ठुमकत नार लचकत या गाण्यावर तो थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री संस्कृती बालगुडेदेखील दिसत आहे. हा व्हिडीओ डान्सच्या सरावादरम्यानचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्यासाठी सरावाला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचा भाग असल्याचा आनंद आहे. तसेच हा व्हिडीओ अभिनेत्री पूजा सावंतने शूट केल्याचे त्याने लिहिले.

वैभवने हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याला खूप दिवसांनंतर डान्स करताना पाहून आनंद झाल्याचे चाहत्यांनी म्हटले. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान दादा”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप दिवसांनंतर तुला डान्स करताना पाहून आनंद झाला”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “कमाल”. अशा रीतीने नेटकऱ्यांनी वैभवचे कौतुक केले आहे.

अनेक चाहत्यांनी सुंदर हावभाव, असे म्हणत कौतुक केले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. वैभव तत्त्ववादीबरोबर पूजा सावंतनेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये भूषण प्रधानसह आणखी इतर कलाकारही दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना पूजा सावंतने लिहिले, “६० वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, तालीम सुरू.”

अभिनेत्री पूजा सावंतदेखील सोशल मीडियावर सक्रिय असते. चित्रपटांबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यातील काही क्षणदेखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.