वैभव तत्त्ववादी हा मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठीसह त्याने हिंदी कलाविश्वातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘कमांडो’ सीरिजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं. अलीकडेच वैभवने रेडिओ मिरची प्लसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘बॉईज’ चित्रपटाचे एकूण किती भाग येणार?, दिग्दर्शकाचं उत्तर ऐकून व्हाल थक्क; म्हणाला, “आतापर्यंत…”

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात वैभवने पेशवे बाजीरावांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याला पहिल्यांदाच बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि रणवीर-दीपिकासह काम करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : Video : “…अन् मी त्या मोहाला बळी पडलो”, उमेश कामत-प्रिया बापटने परदेशात केलं असं काही…

‘बाजीराव मस्तानी’बद्दल सांगताना वैभव म्हणाला, “संजय लीला भन्साळींचं संपूर्ण आयुष्य फिल्ममेकिंगमध्ये जातं. प्रत्येक सीनसाठी ते प्रचंड मेहनत घेतात. आमच्या सेटवर रात्री उशिरापर्यंत शूटिंग चालायचं. सगळे पॅकअप करून गेल्यावर एकदा मी सहज संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल विचारलं तेव्हा मला सर, आजच्या दिवसाचं सगळं एडिट बघत आहेत असं सांगण्यात आलं. रात्री २ वाजता शूट संपवून ते हे काम करत होते. सतत त्यांच्या डोक्यात तोच विचार सुरु असायचा. त्यांची एनर्जी कोणीही मॅच करू शकत नाही.”

वैभव पुढे म्हणाला, “मी एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी त्यापूर्वी केव्हाच काम केलं नव्हतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. सेटवर एकावेळी ४०-५० घोडे, १०० मशाली आणि ५०० जुनियर आर्टिस्ट असायचे. अशावेळी एखादा डायलॉग बोलताना गडबड झाली की, अख्ख्या सीनसाठी धावपळ व्हायची. मला याचं प्रचंड दडपण यायचं कारण, एका रिटेकसाठी जवळपास २० ते २५ मिनिटं जायची. त्यामुळे एक जरी डायलॉग बोलताना मी चुकलो की, मला कसंतरी वाटायचं. एकदा असं झालं तेव्हा दीपिका मला म्हणाली, अरे काही काळजी करू नकोस आपण पुन्हा करू…दीपिकाने धीर दिला पण, तरीही माझ्या मनात या गोष्टी सुरु असायच्या.”

हेही वाचा : वयावरून ट्रोल करणाऱ्यांसाठी ऐश्वर्या नारकरांची पोस्ट; ‘या’ गाण्यावर बनवला नवा व्हिडीओ; म्हणाल्या, “तुमचं वय…”

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi shares working experience with deepika padukone on the set of bajirao mastani sva 00
Show comments