‘वेड लावी जीवा’ या चित्रपटातून वैदेही परशुरामीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर ‘वजीर’, ‘कोकणस्थ’, ‘सिम्बा’, ‘लोच्या झाला रे’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘झोंबिवली’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘एक दोन तीन चार, ‘वृंदावन’ अशा मराठीसह हिंदी चित्रपटांतून अभिनेत्रीने भूमिका साकारल्या आहेत. आता अभिनेत्री ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटानंतर ती पुन्हा एकदा सुबोध भावेंबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. आता एका मुलाखतीत वैदेहीने तिचा लाइफ मंत्रा काय आहे, यावर वक्तव्य केले आहे.
वैदेही परशुरामीचा लाइफ मंत्रा काय आहे?
वैदेही परशुरामीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचा लाइफ मंत्रा काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “मी बऱ्याचदा कृतज्ञतेविषयी बोलते. माझ्या व्यक्तिमत्त्वात ती महत्त्वाची भूमिका निभावते.” मंत्राबाबत बोलायचे, तर मी कायम एक तत्त्व पाळत आली आहे. असं काही करू नका; ज्याचा शेवट पश्चात्तापाने होईल आणि एकदा जर तुम्ही एखादी गोष्ट केली, तर मग पश्चात्ताप करू नका. मला असं वाटतं की, ही गोष्ट माझ्याबरोबर कायम आहे आणि ती पुढे तशीच राहावी.
‘संगीत मानापमान’च्या सेटवर अनेक सीनियर कलाकार आहेत. तर काम करताना थोडाफार तणाव असतो का? यावर बोलताना वैदेहीने म्हटले, “ताण म्हणणार नाही; पण ती एक धाकधूक कायमच असते. प्रत्येक सिनेमा खूप गोष्टी शिकवून जातो. मला असं वाटतं की, प्रत्येक सिनेमा व प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळतं. काय करावं, काय करू नये हे सगळंच सातत्यानं शिकायला मिळतं. आता मला असं वाटतं की, हळूहळू चांगल्या माणसांबरोबर काम करून माझ्या हे लक्षात आलंय की, हे दडपण असणं चांगली गोष्ट आहे. फक्त त्या दडपणाचं रूपांतर आत्मविश्वासात व्हायला हवं. जे अनुभवाने थोडं थोडं जमायला लागलं आहे. दडपण १०० टक्के होतं. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’नंतर सुबोध भावे, सुमित राघवन यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करायचंय. इतक्या वर्षांत कलाकार म्हणून प्रत्येकात बदल होत असतात. माझ्यातही झालेत. तर ते पहिलं पाऊल थोडंसं दडपण देणारं होतं. पण मला असं वाटतं की, सगळेच इतके कमाल कलाकार आहेत. इतकी चांगली माणसं आहेत, ते सेटवर सगळं निघून जातं.”
जर कधी मनस्थिती ठीक नसेल, तर पहिला फोन आई-बाबांना जातो. आई माझ्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आई-बाबांना माहीत आहे की, मला कसं शांत करायचं, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे. त्याबरोबरच मला जे हवंय ते खाता यावं म्हणून वर्कआऊट हा माझ्या लाइफस्टाईलचा भाग आहे, असेही वैदेहीने म्हटले आहे. आता संगीत ‘मानापमान’मधून वैदेही पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.