‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’, ‘टाइमप्लीज’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री वंदना गुप्तेंनी मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना लहानपणापासून घरीच कलाक्षेत्राचा वारसा लाभला. माणिक व अमर वर्मा यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या घरी सतत दिग्गज गायकांचं येण-जाणं असायचं. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्तेंनी याविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या मोठ्या बहीण भारती आचरेकर देखील उपस्थित होत्या.
वंदना गुप्ते म्हणाल्या, “मंगेशकर कुटुंबीयांशी आमचे खूप जवळचे संबंध होते. लतादीदींच्या हस्ते मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार सोहळ्याला मी जेव्हा गेले होते तेव्हा, पडदा उघडण्याआधी त्या माझा हात हातात घेऊन बसल्या होत्या. तो मऊ स्पर्श मला अजूनही आठवतो आहे. त्यावेळी लतादीदी मला माझ्या आईच्या ( माणिक वर्मा ) जुन्या आठवणी सांगत होत्या.”
हेही वाचा : ‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’
“लतादीदी आम्ही लहान असताना खूप वेळा आमच्या घरी खूपदा यायच्या. माझे वडील ( अमर वर्मा ) उर्दूमध्ये एम.ए. होते. त्यामुळे ते लतादीदींना उर्दू शिकवायचे. त्या आमच्या घरी उर्दू शिकायला यायच्या. माझ्या आईपेक्षा लतादीदी दोन वर्षांनी लहान होत्या. दोघींनीही एकत्र एका स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला हार्मोनियम मिळणार होती. त्यावेळी लतादीदींना पहिलं बक्षीस हार्मोनियम मिळालं होतं आणि माझ्या आईला देखील रेडिओ मिळाला होता. दोघी तेव्हा १३-१४ वर्षांच्या असतील. सगळ्या गाण्यांच्या रिहर्सल आमच्या घरी व्हायच्या. याशिवाय माझ्या सासरी देखील त्या यायच्या.” अशी आठवण वंदना गुप्तेंच्या बहीण भारती आचरेकर यांनी सांगितली.
हेही वाचा : अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री
दरम्यान, वंदना गुप्तेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नुकताच त्यांना ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.