संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) हा सध्या विविध नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकामध्ये संकर्षण प्रमुख भूमिकेत दिसला. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्याने महाराष्ट्रभर दौरे केल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, ‘संकर्षण via स्पृहा’ या कार्यक्रमालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. सध्या अभिनेता वंदना गुप्ते(Vandana Gupte) व अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्याबरोबरच ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. संकर्षणची प्रमुख भूमिका असलेले हे नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी संकर्षण कऱ्हाडेबद्दल एक वक्तव्य केले आहे.

त्यामुळे त्याला संकर्षणपेक्षा…

अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकताच ‘तारांगण’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संकर्षण कऱ्हाडेबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “संकर्षण हा फक्त लेखक म्हणूनच नाही तर त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच विस्मयकारक वाटते. त्याचे व्यक्तीमत्वच आश्चर्यचकित करते. मी जितकी त्याच्या सहवासात येतेय, त्याचे एक-एक पैलू बघून असं वाटतं की या मुलामध्ये काय नाहीये? सगळेच गुण त्याच्याकडे आहेत. लोकांकडे इतकं नसतं. एखाद्या व्यक्तीत एक कलाकार तरी असतो किंवा दिग्दर्शक तरी असतो. एकतर लेखक असतो किंवा कवी असतो, पण संकर्षणमध्ये सगळंच आहे. त्याच्याकडे भयंकर बुद्धिमत्ता आहे. तो सध्या ३५-३६ वर्षांचा असेल, एवढ्या वयाच्या अनुभवातून त्याने नाटक घडवून आणलेली आहेत. लिहिली आहेत. सगळीच उत्तम नाटकं लिहिली आहेत. एरवीसुद्धा लोकांना आनंद द्यायला त्याला आवडतं. त्याला प्रेक्षकांनाही हसवायला आवडतं. त्यासाठी त्याला नाटक हे माध्यम मिळालं आहे, त्याला ते आवडत आहे, त्यामुळे त्याला संकर्षणपेक्षा संचार्षण म्हटलं तरी चालेल. त्याचा सगळीकडे संचार असतो. उत्तम नट आणि उत्तम माणूस रंगभूमीला मिळाला आहे. हिरा मिळाला आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही”, असे म्हणत वंदना गुप्ते यांनी संकर्षणचे कौतुक केले आहे, तसेच त्याला हिऱ्याची उपमा दिली आहे.

अभिनयाबरोबरच संकर्षण कऱ्हाडे त्याच्या कवितांसाठी ओळखला जातो. त्याच्या मनाला भिडणाऱ्या कवितांमुळे तो प्रेक्षकांचा लाडका आहे. सामाजिक-राजकीय विषयांवरील विविध कविता लोकप्रिय ठरल्या आहेत. याबरोबरच काही दिवसांपूर्वी तो ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमाच्या परीक्षकपदी दिसला होता. त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील दिसली होती. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अनेकदा काही आठवणी, किस्से व अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

दरम्यान, वंदना गुप्ते यांच्याबद्दल बोलायचे तर अभिनेत्री सध्या त्यांच्या आगामी ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहेत. अशोक सराफ व वंदना गुप्ते यांची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.