नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं नाव आज घराघरांत लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी त्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात झळकल्या होत्या. अगदी लहानपणापासूनच त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. वंदना गुप्ते यांनी नुकतीच त्यांची मोठी बहीण भारती आचरेकर यांच्याबरोबर लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
वंदना गुप्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. शर्मिला यांचे वडील मोहन वाघ यांच्या नाटकात वंदना गुप्ते काम करायच्या. जुन्या आठवणीत सांगत अभिनेत्री म्हणाल्या, “मी आणि शर्मिला आम्ही दोघींनी मिळून एकत्र खूप धमाल केली आहे. राज आणि शर्मिला यांना मी खूप जवळून पाहिलंय. त्यांच्या चिठ्ठ्या पोहोचवण्याचं काम मी केलं आहे.”
हेही वाचा : वंदना गुप्तेंनी माधुरी दीक्षितसमोर ठेवलेली ‘ही’ अट; किस्सा सांगत म्हणाल्या, “ती खूप घरंदाज, संसार सांभाळून…”
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “मोहन काकांचं म्हणजेच तिच्या वडिलांचं शर्मिलावर एकदम बारीक लक्ष असायचं. ती कुठे जाते वगैरे त्यांना सगळं माहिती असायचं. त्यांचा मोठ्या लेकीवर विश्वास होता पण, शर्मिलावर अजिबात नव्हता. एकदा मी कॉलेजमधून घरी जात असतात शमी मागून येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाली, ‘मी तुझ्याबरोबर होते हा…’ त्यानंतर मी समोर पाहिलं तेव्हा मोहन वाघ उभे होते. त्यांनी विचारलं कुठून आलात. त्यांना मग मी इथेच कॉफी प्यायला गेले होतो असं सांगितलं. राज-शर्मिलाच्या लग्नात सुद्धा मी खूप धमाल केली होती.”
हेही वाचा : अनन्या पांडेच्या बहिणीला मुलगा होणार की मुलगी? अलानाने बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल, व्हिडीओ व्हायरल
“आमची ती मैत्री आजवर टिकून आहे आणि राजाला ( राज ठाकरे ) या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आताही शिवाजी पार्कला आम्ही शेजारी राहतो त्यामुळे सतत भेटणं होत असतं” असं वंदना गुप्तेंनी सांगितलं.
दरम्यान, वंदना गुप्तेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नुकताच त्यांना ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.