Vanita Kharat : अलीकडच्या काळात नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी आपले शेजारी कायम आपल्याबरोबर असतात, तर दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला सर्वात जास्त सख्खे वाटतात. अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल या दोघी शेजारी नेमक्या कशा झाल्या, तर आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात या दोन लोकप्रिय अभिनेत्री शेजारधर्म निभावताना दिसतील.
अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आप्त स्वकियांसारखे असायचे. सगळ्या सुख-दुःखामध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यातून अनेक गमतीदार किस्से घडायचे, या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
या चित्रपटाच्या निमिताने या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत. आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं या दोघी सांगतात. धमाल अनुभव असणारा ‘इलू इलू’ चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास दोघी व्यक्त करतात’.
‘इलू इलू’ हा सिनेमा ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकत्याच एका सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत बॉलीवूड अभिनेत्री एली अवरामने उपस्थितांची मनं जिंकून घेतली होती.
हेही वाचा : सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, ‘इलू इलू’ सिनेमाता एली अवराम, वीणा जामकर, वनिता खरात ( Vanita Kharat ) यांच्यासह आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.