अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकर. उत्तमोत्तम चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये काम करत अनेक वर्ष त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. परंतु गेली काही वर्ष त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या नाहीत. मधल्या काळात त्या छोट्या पडद्यावर सक्रिय होत्या. परंतु त्या वर्षात त्या चित्रपटात का काम करत नाहीत, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर त्यांनी स्वतः याचं कारण उघड केलं आहे.
आणखी वाचा : आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार सिक्वेल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’च्या मुलाखतीमध्ये त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’वर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी बोलताना वर्षा उसगांवकर यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या, “चित्रपटात काम करण्याची माझी खूप इच्छा होती, पण कणा असलेल्या भूमिकाच मला विचारण्यात आल्या नाहीत. एक दिवसाची, दोन दिवसाची, दहा दिवसाची भूमिका मला ऑफर होत होत्या.”
पुढे त्यांनी त्यांना गेल्या काही वर्षात आलेले निर्माता – दिग्दर्शकांचे अनुभवही सांगितले. त्या म्हणाल्या, “एक निर्माता माझ्याकडे एका चित्रपटाची कथा ऐकवायला आला. त्याने कथा ऐकवायला सुरुवात केली. तो म्हणाला, “तुम्ही हिरोच्या आई असता…तुम्ही अमेरिकेहून येता” आणि पुढे तो कथा विसरला. मला आश्चर्य वाटलं. मी अमेरिकेहून भारतात येऊन काय करते, हेच जर दिग्दर्शक विसरत तर मी अशी भूमिका का करायची? काम करण्याच्या समाधानाबरोबरच पैसे मिळवणंही महत्वाचं असलं तरी पैशासाठी मी चित्रपटांच्या कथेच्या बाबतीत तडजोड करणार नाही.” दरम्यानच्या काळात त्यांनी जे मराठी चित्रपट केले ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत. मराठीबरोबरच त्यांनी काही कोकणी चित्रपट केले, जे त्यांना आनंद देऊन गेले असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षा उसगांवकर जवळजवळ ८ वर्ष मराठी चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेर शिवराज’ चित्रपटापासून त्यांनी मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरु केली. तसेच नुकताच त्यांचा ‘हवाहवाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्या या चित्रपट अत्यंत महत्वपूर्ण भूमिका सकारत आहेत.