९० च्या दशकातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांना ओळखलं जातं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ‘माई’ हे गौरीच्या सासूबाईंचं पात्र साकारत आहेत.
हेही वाचा : कंगना रणौतने राजकारणात येण्याविषयी मांडलं मत; म्हणाली, “मी एक देशभक्त…”
सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच वर्षा उसगावकर शूटिंगमधून वेळ काढत त्यांच्या गोव्याच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव वर्षा उसगावकरांना गोव्यात त्यांच्या मूळ गावी साजरा करायचा होता. गोव्यातील उसगाव येथे अभिनेत्रीचं प्रशस्त घर आहे. त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्यासह अभिनेत्री गिरीजा प्रभू गोव्याला गेली होती. याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या गिरिजाचं वर्षा उसगावकर मोठ्या आनंदाने स्वागत करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांच्या घरासमोर असलेलं तुळशी वृंदावन, प्रशस्त खोल्या, बाप्पासाठीची स्वतंत्र खोली या सगळ्या गोष्टी या व्हिडीओमध्ये लक्ष वेधून घेतात. अभिनेत्री गिरिजा प्रभू ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे दोघींमध्ये छान नातं तयार झालं आहे. त्यामुळेच यंदा वर्षा यांनी त्यांच्या लाडक्या गिरिजाला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खास आमंत्रण दिलं होतं.
हेही वाचा : वहिदा रेहमान यांची पहिली प्रतिक्रिया, “दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर..
दरम्यान, वर्षा उसगावकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. उसगावकरांच्या घरची परंपरा, संस्कृती, बाप्पाची पूजा, वर्षा उसगावकरांनी केलेलं गिरिजाचं स्वागत या गोष्टी पाहून नेटकरी भारावले आहेत. “किती छान घर आहे”, “ताई आम्हाला सुद्धा गोव्याला बोलवा”, “सुंदर घर आहे मॅडम” अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.