दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हा ऐतिहासिक चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता अक्षय कुमार यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं समजताच सगळ्यांनाच सुखद धक्क बसला. शिवाय या चित्रपटामधील इतर कलाकारांचे लूक समोर आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते प्रवीण तरडे.
प्रवीण तरडे यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता ते स्वतः अभिनेता म्हणून मराठीमधील बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करत आहेत. या चित्रपटामध्ये प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसतील.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्यानिमित्ताने त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “कोणतीही भूमिका साकारताना दडपण हे असतंच. ही भूमिका साकरणं खूप मोठी जबाबदारी आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्यानंतर सरसेनापती प्रतापराव गुजर ही भूमिका साकरत आहे. त्यामुळे दडपण तर नक्कीच आहे. महेश अगवणे पाटील, श्रीपाद चव्हाण हे माझ्या शरीरयष्टीसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मराठी योद्धा जगासमोर शोभून दिसावा त्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं करणार.”
“महेश मांजरेकर यांचा नंबर माझ्या मोबाईमध्ये गुरुजी म्हणून सेव्ह आहे. महेश मांजरेक यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी मुंबईमध्ये आलो. त्यांच्याबरोबर मी काम केलं. ट्रॉली कशी धरायची, फ्रेम कशी लावायची या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. १२-१३ वर्षांपूर्वी ते मला म्हणाले होते की पव्या तू थिएटरचा माणूस आहेस. पण तुला घेऊन कधीतरी मी चित्रपट करणार. आज दिलेला शब्द त्यांनी पाळला. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मी आज आहे. त्याला मी नक्कीच न्याय देईन.” प्रवीण तरडे यांच्या लूकला प्रेक्षकांचीही पसंती मिळताना दिसत आहे.