दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. चित्रपटाच्या भव्य लॉंचसोहळा चांगलाच गाजला. त्यावर बऱ्याच चांगल्या आणि वाईट प्रतिक्रियाही आल्या. चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचंही या सोहळ्यात जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
या चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर यातील कित्येक गोष्टींना प्रचंड विरोध झाला. चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मूलगा सत्य मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्याच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर बऱ्याच लोकांनी टीका केली, तसेच महाराजांच्या या शूरवीर मावळ्यांच्या वेशभूषेपासून दिसण्यापर्यंत कित्येकांनी वेगवेगळ्या चुका निदर्शनास आणून दिल्या.
आणखी वाचा : “तीच गळचेपी, तीच कुचंबणा…” मराठी चित्रपटाचे शो रद्द केल्यानंतर उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका
याविषयीच आता नुकतंच या चित्रपटाचे निर्माते वसिम कुरेशी यांनी वक्तव्य केलं आहे. या चित्रपटासाठी मांजरेकर यांनी प्रचंड मेहनत घेतली असून हा त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे असंही त्यांनी यात म्हंटलं आहे. याविषयी बोलताना वसिम म्हणाले, “महेश मांजरेकर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहेत, गेली ७ वर्षं ते यावर मेहनत घेत आहेत. या चित्रपटासाठी मांजरेकर यांनी भरपूर अभ्यास केला आहे तसंच या चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनावर ते अत्यंत सावधपणे काम करत आहेत.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ७ मावळ्यांची ही शौर्यगाथा २०२३ च्या दिवाळीदरम्यान मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तामीळ, तेलुगू या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय यामध्ये प्रवीण तरडे, यश दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकल, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्य मांजरेकर आणि अक्षय कुमारसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मराठी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.