मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात प्रदर्शित झाले आहेत. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटांनी चांगली कामगिरी केल्यानंतर गेल्या वर्षीच ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा : “दाढ काढलीस?”, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला, “अहो लय…”
‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून शिवप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या सर्वांसाठी आनंदाची बातमी असून चित्रपटाचे नवे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘वीर मुरारबाजी’च्या टीमने आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला अभिनेता अंकित मोहनने हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
हेही वाचा : “तुम्ही खाल्लेला विचित्र पदार्थ कोणता?”, अतुल कुलकर्णी म्हणाले, “बेडकाचे पाय अन्…”
“आज ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिन असल्याने आम्ही शूरवीर बाजीप्रभू देशपांडे तसेच बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रम आणि बलिदानाला वंदन करुन ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे नवे पोस्टर सादर करत आहोत. लवकरच ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येईल.” असे चित्रपटाच्या टीमने जाहीर केले आहे.
‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात अभिनेता अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. अंकितसह हरीश दुधाडे, तनिषा मुखर्जी, सौरभराज जैन, संतोष जुवेकर, प्राजक्ता गायकवाड यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
दरम्यान, ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी सातशे मावळ्यांसह पुरंदर किल्ल्यासाठी दिलेला लढा पाहायला मिळणार आहे. मुरारबाजी देशपांडे यांनी औरंगजेबाने पाठवलेल्या दिलेरखानाच्या सैन्याशी १६६५ मध्ये युद्ध केले होते. मुरारबाजींना या लढाईत वीरमरण आले, यानंतर मिर्झा राजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी ‘पुरंदरचा तह’ केला होता.