‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता अभिनेते अशोक सराफ यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमावेळी अशोक सराफ यांनी हजेरी लावली. यादरम्यान त्यांना ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

“बाईपण का भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण, पुरुषांचं भारीपण कोणीही दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कधीच कुणी गवगवा करत नाही.

स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात”, असं अशोक सराफ यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे उलटले आहेत. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor ashok saraf talk about baipan bhari deva marathi movie mens struggle life nrp
Show comments