मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते डॉ. मोहन आगाशे सध्या ‘लोकशाही’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी मराठी कलाविश्वात अधिराज्य गाजवलं आहे. ‘लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘अग्निहोत्र’ अशा गाजलेल्या मालिका असो किंवा ‘देऊळबंद’सारखे चित्रपट या प्रत्येक कलाकृतींमध्ये मोहन आगाशेंनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहतात. ‘लोकशाही’ हा चित्रपट नावाप्रमाणे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहे. ९ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात झाला. या निमित्ताने अभिनेते मोहन आगाशे यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीबाबत आपलं मत मांडलं.
महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थितीबाबत डॉ. मोहन आगाशे ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “महाष्ट्रातील सद्य राजकीय स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी आहे. प्रत्येकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मला जी अस्वस्थता जाणवते तेच इतर लोकही अनुभवत असतील. यामुळेच मला सर्वाधिक काळजी आपल्या नव्या पिढीची वाटते. आपण त्यांच्याकरता काय आदर्श ठेवतोय? पण, कदाचित आपली नवीन पिढी आपल्यापेक्षा अधिक सुजाण असू शकते. नव्या पिढीतील लोक परिस्थिती उत्तम हाताळू शकतात असं मला वाटतं. त्यामुळे तो एक आशेचा किरण नक्कीच आहे.
हेही वाचा : निसर्गरम्य जागा, वेस्टर्न लूक अन्…; स्पृहा जोशीची नवऱ्यासह गोवा ट्रिप; शेअर केला खास व्हिडीओ
“राजकारणाचा आता धंदा झालेला आहे. यामुळे चांगल्या राजकारणी लोकांची पंचायत झाली आहे. कोणत्याही प्रामाणिक आणि सचोटीने काम करणाऱ्या माणसाला अशा धंदेवाईक वृत्तीचा नेहमीच त्रास होतो. सगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली” अशी खंत मोहन आगाशे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : लग्नानंतर स्वानंदी टिकेकरने घरासाठी बनवून घेतली खास नेमप्लेट; रातराणीच्या फुलांनी वेधलं लक्ष, पाहा फोटो
दरम्यान, ‘लोकशाही’ चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांच्यासह समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.