विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पा हे मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. गेले कित्येक दिवस ते मनोरंजन विश्वापासून लांब आहेत. आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरु असताना अचानक त्यांना गंभीर आजाराचे निदान झाले. २०२० मध्ये अचानक खोकला सुरु होऊन त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यानंतर वैद्यकीय तपासणीत त्यांना ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ या आजाराचे निदान झाले. जवळपास आठ ते दहा महिन्यांच्या संघर्षानंतर आज त्यांची प्रकृती स्थिर आहे. विद्याधर जोशींनी या कठीण परिस्थितीवर कशी मात केली आणि या काळात त्यांना कोणी साथ दिली याविषयी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत विद्याधर जोशींना करोनाचे निदान झाले त्यानंतर त्यांनी औषधोपचारांना सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला त्यावेळी हा साधा ताप नसून यामागील कारण वेगळे असल्याचे त्यांच्या डॉक्टरांच्या लक्षात आले. सिटी स्कॅन केल्यावर बाप्पा जोशींच्या फुफ्फुसांवर जखमा आढळल्या आणि ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ या आजाराचे निदान झाले. अशा परिस्थितीतही त्यांनी मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाला हजेरी लावली होती.
हेही वाचा : “तुम्ही बिगबॉसच्या शिवसारखे दिसता” चिमुकल्या चाहत्याची शिवने घेतली फिरकी, VIDEO एकदा पाहाच
विद्याधर जोशी याविषयी सांगताना म्हणाले, “पुढे आजार अधिकाधिक वाढत गेला आणि दोन महिन्यांत ८० ते ८५ टक्के फुफ्फुसं निकामी झाली. फुफ्फस प्रत्यारोपण (lungs transplant) हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. प्रत्यारोपण प्रक्रिया प्रचंड खर्चिक होती. परंतु, तरीही कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.” १२ जानेवारी २०२३ रोजी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
विद्याधर जोशी पुढे म्हणाले, “पायाच्या एका बोटाची हालचाल करायला किती ताकद लागते याची जाणीव शस्त्रक्रियेनंतर झाली. मी जवळपास पांगळा झालो होतो. व्यायाम केला हवा, विश्रांती हवी अशा सगळ्या गोष्टी आठवून आपल्या शरीराची किंमत मला कळाली.” या वेळी अजित भुरे, वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, धनंजय गोरे, लीना गोरे, वैशाली यांनी सतत चौकशी करुन पाठिंबा दिल्याचे अभिनेत्यांनी सांगितले.
हेही वाचा : दिलीप प्रभावळकर – रोहिणी हट्टंगडींचा ‘आता वेळ झाली’
दरम्यान, जानेवारीमध्ये सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता ते नैसर्गिक श्वास घेऊ शकतात. रुग्णालयातून घरी सोडताना त्यांचा कृत्रिम प्राणवायूचा आधाक काढण्यात आला. आता त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा आहे.