Vijay Kadam : नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम आज काळाच्या पडद्याआड गेले. मुंबईतील अंधेरी येथील विजय यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. सगळीकडे शोककळा पसरली असून कलाकार मंडळी दुःख व्यक्त करत आहेत.
‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक नाटकातून विजय कदम ( Vijay Kadam ) यांनी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं. याचं रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विजय कदम यांनी आजवर विविधांगी भूमिका केल्या असल्या तरी त्यांना विनोदी अभिनेता म्हणून अधिक लोकप्रियता मिळाली होती. ऐंशी व नव्वदच्या दशकात रसिक प्रेक्षकांना त्यांनी खळखळून हसवण्याचं अविरत काम केलं होतं. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याचं आज दुःखद निधन झालं.
हेही वाचा – विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”
गेल्या अनेक वर्षांपासून विजय कदम ( Vijay Kadam ) कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर त्यांनी मात देखील केली होती. पण त्यांना पुन्हा कर्करोग झाला. अंधेरी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र कर्करोगाशी दुसरी झुंज त्यांची अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या पत्नी देखील अभिनेत्री आहेत. पद्मश्री जोशी असं त्यांचं नावं आहे. विजय कदम यांची पत्नी व अभिनेत्री पल्लवी जोशी या सख्ख्या बहिणी आहेत.
हेही वाचा – “माझी राजकुमारी…”, संजय दत्तने लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाला…
प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी यांच्या मुली पद्मश्री व पल्लवी आहेत. तसंच दोघींना एक भाऊ देखील आहे. मास्टर अलंकार असं नाव असून ते देखील एक उत्कृष्ट अभिनेते होते. सध्या ते इंडस्ट्रीपासून दूर आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. पल्लवी जोशी या विजय कदम ( Vijay Kadam ) यांच्या मेव्हणी आहेत.