चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसते. विजय पाटकर(Vijay Patkar) हे अशा अभिनेत्यांपैकी आहेत. त्याच्या अनोख्या अंदाजासाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘क्या कूल है हम’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमाच झोलझाल’, ‘सिंघम’, ‘गोलमाल ३’,’तीस मार खान’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘सिम्बा’, ‘सर्कस’, अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांसाठी विजय पाटकर ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदीमध्येदेखील काम केले आहे. आता एका मुलाखतीत विजय पाटकर यांनी त्यांच्या आईच्या निधनाची बातमी त्यांना एका शूटिंगदरम्यान समजल्याची आठवण त्यांनी सांगितली आहे.

माझी आई गेली…

विजय पाटकर यांनी नुकतीच ‘सुमन मराठी म्युझिक’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या आईच्या निधनाची बातमी त्यांना कशी समजली हे त्यांनी सांगितले. विजय पाटकर म्हणाले की सिनेमा किंवा कमिटमेंट म्हटल्यानंतर काही गोष्टी कराव्या लागतात. ते म्हणाले, “मी माझा मोठेपणा सांगत नाही. मी एक हाजमोलाची जाहिरात शूटिंग करत होतो. कादर खान आणि मी त्यामध्ये काम करत होतो. सतीश कौशिक हे दिग्दर्शक होता. मी सकाळी आईशी बोललो. बारा वाजता माझी आई गेली होती. माझ्या मोबाईलवर मिसकॉल पडला होता.”

“मी सतीश कौशिकला म्हटलं पाच मिनिट दे. पाच मिनिट बाहेर गेलो आणि आलो. दीड वाजता माझं शूटिंगचं पॅकअप झालं होतं. माझी आई गेली आहे हे मी बारा ते दीड कोणाला कळूही दिलं नाही. दीड वाजेपर्यंत मी शूटिंग केलं. संजीव शर्मा म्हणून दिल्लीचा दिग्दर्शक होता. त्याला जाणीव झाली की काहीतरी घडलं आहे. त्याने मला विचारलं की काही झालं आहे का? मी सांगितलं की माझ्या आईचं निधन झालं आहे. तो म्हणाला कधी? मी म्हटलं की दीड तासापूर्वी. तो म्हणाला की सांगायचं होतं. मी त्याला म्हणालो की सेट लागला आहे, तर मी कसा बोलू. खूप वेळ शूटिंग चालणार असतं तर मी सांगितलं असतं. म्हटलं की मी जोपर्यंत सांभाळू शकत होतो, तोपर्यंत सांभाळलं. त्यावेळी तसा मी नवीन होतो. आपण घाबरत असतो. बोलायची ताकद नसते. त्यातल्या त्यात मॅनेज झालं म्हणून करू शकलो.”

याबरोबरच, जॉनी लिव्हर यांनी मी गेली ४० वर्ष एकत्र काम करतोय. तो मला भावासारखाच आहे. त्याने मला खूप पाठिंबा दिला. तो पहिल्यापासूनच सगळ्यांची खूप काळजी घेतो. तो प्रत्येकाशी चांगली वागतो. आम्ही जास्त एकत्र काम केल्याने, तो माझा आदर ठेवतो. असे म्हणत जॉनी लिव्हर यांच्याबद्दलच्या मैत्रीबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.