रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी मागच्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते आजही आपल्यात आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. विक्रम गोखले यांच्या पश्चात त्यांचा ‘सूर लागू दे’ हा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काल ३० ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. हे पोस्टर प्रदर्शित करताना दिग्दर्शक महेश मांजरेकरसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरच काम करण्याच्या आठवणी सांगितल्या. या पोस्टरचे अनावरण करताना ते फार भावुकसुद्धा झाले.
आणखी वाचा : Tejas Box office collection: ५०% शोज रद्द, शून्य तिकीट विक्री; कंगनाचा चित्रपट ठरतोय जबरदस्त फ्लॉप
त्यांच्याविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर फार सुंदर क्षण घालवले आहेत. नटसम्राटमध्ये ही काही सीन्स असले तरी त्यांचा सहवास मला लाभला. बाकी आम्ही ‘शिवाजी पार्क’ आणि इतरही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अभिनेते आणि दिग्दर्शकांसाठी ते एक प्रेरणास्थान होते. त्यांचा हा शेवटचा चित्रपट ब्लॉकबस्टर होवो हीच इच्छा आहे. मी खूप वर्षं या क्षेत्रात काम करतोय, पण विक्रम गोखलेंइतका उत्कृष्ट नट आणि माणूस मी आजवर पाहिलेला नाही.”
ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक ‘किंग’ कुमार यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केलं आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते ‘सूर लागू दे’च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.