विनय आपटेंना अभिनयाचं विद्यापीठ, अभिनय शाळेचे कुलगुरू म्हटलं जायचं. याचं कारण होतं त्यांची रंगभूमीवरची अफाट निष्ठा आणि सहज सुंदर अभिनय. अगदी तसंच दिग्दर्शनही त्यांनी केलं. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत विनय आपटेंनी भारदस्त आवाज, स्पष्ट उच्चार, भिडणारी नजर, सहज अभिनय अशा अनेक गुणांच्या जोरावर व स्वतःच्या हिंमतीवर मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं आणि ते आजन्म टिकवून ठेवलं. नवोदित कलाकारांसाठी विनय आपटे हे एखाद्या ड्रामा स्कूलपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या कलाकृतींचा अभ्यास केला तरीही अनेक गोष्टी नव्या पिढीला कळतील. विनय आपटेंमुळेच आज मराठी सिनेसृष्टीला अनेक उत्तम कलाकार मिळाले आहेत. अशा या अफलातून, समजूतदार, निस्वार्थी, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनयाची उत्तम जाण असलेल्या कलाकाराची आज पुण्यतिथी. त्यानिमित्तानं आज आपण विनय आपटेंचा थोडक्यात प्रवास अन् काही किस्से…

१७ जून १९५१ या दिवशी विनय आपटेंचा मुंबईत जन्म झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. एकांकिका हा त्यांचा जीव की प्राण होता. एकांकिकांपासूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. एकांकिकांमध्ये मोठ्या समूहाचा नेपथ्य म्हणून वापर करण्याचा आगळा-वेगळा प्रयोग त्यांनीच सुरू केला; जो आज आपल्याला अनेक एकांकिकांमध्ये पाहायला मिळतो. ‘थिएटर ऑफ अव्हेलिबिलिटी’ आणि ‘बहिष्कृत’ या एकांकिकांमध्ये त्यांनी समूह नेपथ्याचा वापर केला होता. ‘पुंडलिक शेट्टीवार’, ‘कुल वृत्तांत’, ‘अपुरी’ या त्यांच्या गाजलेल्या एकांकिका होत्या. त्यांना या एकांकिकांसाठी ७०च्या दशकात अनेक पुरस्कारही मिळाले. राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्ष त्यांनी सर्वात्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

हेही वाचा – मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

१९७२ हे तेच वर्ष होतं ज्या वर्षी दूरदर्शनमध्ये निर्माता म्हणून त्यांनी पाऊल ठेवलं. यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रमाची निर्मिती केली. ‘नाटक’, ‘गजरा’, ‘युवावाणी’ या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या लघुनाटिका तर तुफान गाजल्या. नाविन्यांची आस असणाऱ्या विनय आपटेंनी एका मालिकेचा शेवट हा प्रेक्षकांना विचारून केला होता. नाटक, मालिका, चित्रपट एवढ्यावरचं मर्यादित न राहता त्यांनी अनेक जाहिराती केल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाहपदाचा कारभार त्यांनी अनेक वर्षे सांभाळला होता.

विनय आपटे स्वतः जवळ पिस्तुल का ठेवायचे?

विनय आपटे यांचं वादग्रस्त व गाजलेलं नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’. एक मिशन म्हणून त्यांनी हे नाटकं केलं होतं. या नाटकाचं निर्माते उदय धुरत आणि लेखक प्रदीप दळवी अनेक दिग्दर्शकांकडे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ची स्क्रिप्ट घेऊन गेले. पण एकही दिग्दर्शक हे नाटक करायला तयार नव्हता. अखेर विनय आपटे यांच्याकडे या नाटकाच्या दिग्दर्शकांनी जबाबदारी आली. त्यांनी आधी नाटकाची स्क्रिप्ट व्यवस्थितरित्या वाचून घेतली. त्यामध्ये बरेच फेरफार केले. कारण सगळ्यांना महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केलीये एवढं माहीत आहे. पण ती का केली? ही दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेला आहे. कुठेही गांधींच्या विरोधात वाटणार नाही, यांची काळजी विनय आपटे यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून घेतली. विशेष म्हणजे हे नाटक त्यांनी नवोदित कलाकारांना घेऊन केलं होतं. त्यामुळेच रंगभूमीला आणि मराठी मनोरंजनसृष्टीला अभिनेते शरद पोंक्षे मिळाले.

नथुराम नाटक जितकं गाजलं तितकाच त्याला विरोधही झाला. या नाटकामुळे विनय आपटेंसह त्यांच्या घरांच्या जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या. ऑफिसमध्येही फोन करून त्यांना धमकी द्यायचे. त्यामुळे त्या काळात युती सरकारने विनय आपटेंना पोलीस संरक्षण द्यायचं ठरवलं. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांनी विनय यांना सांगितलं की, “आम्ही तुला पोलीस संरक्षण देतोय. तू असाच बाहेर फिरू नकोस.” त्यानंतर विनय आपटेंबरोबर पाच-सहा पोलीस नेहमी असायचे. विनय जिथे जातील तिथे पोलीस असायचे. त्यामुळे त्यांनी पोलिसांसाठी मित्राची गाडी घेतली होती. पण काही काळानंतर विनय यांनी सरकारला पोलीस संरक्षण काढून टाकण्याची विनंती केली. पण सरकारने काही ऐकलं नाही. सरकारने पोलीस संरक्षणाच्या ऐवजी रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्याचा निर्णय घेतला. कधी काही प्रसंग आला तर स्वसंरक्षणाकरता रिव्हॉल्व्हर ठेवं, असा आदेश सरकारकडून आला. त्यामुळे विनय आपटेंनी पिस्तुल घेतलं होतं आणि ते त्यांच्या जवळ बाळगायचे. हा किस्सा त्यांच्या पत्नीने अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.

फोटो सौजन्य – दूरदर्शन

‘धमाल’ प्रदर्शित झाल्यानंतर विनय आपटेंना एका दिवसाला यायचे १०० फोन

मराठी सिनेसृष्टीत पहिला मोबाइल फोन हा विनय आपटेंकडे होता. विनय यांनी मराठी सिनेसृष्टीप्रमाणे हिंदीतही स्वबळावर आपलं स्थान निर्माण केलं होतं. ‘सत्याग्रह’, आरक्षण, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, प्रणाली, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘धमाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ‘धमाल’ चित्रपटातील त्यांची ‘मिस्टर अय्यर’ ही भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेसाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांना विनय आपटेच पाहिजे होते. त्यांची विनय आपटेशी ओळख नव्हती. म्हणून त्यांनी विनय यांना शोधण्यासाठी शिवाजी मंदिरला एक माणूस पाठवला होता. तिथून विनय आपटेंचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना ‘मिस्टर अय्यर’ या भूमिकेसाठी फोन केला. मग जुहूच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे विनय जुहूच्या ऑफिसमध्ये गेले. कथा ऐकून घरी परतल्यानंतर त्यांनी पत्नी वैजयंती आपटे यांना विचारलं, “काय करू कळत नाही? एकच सीन आहे.” मराठीमध्ये प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे हिंदीत एवढ्याशा सीनसाठी काम करून की नको? अशी विनय आपटेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. मग पत्नी वैजयंती यांनी सांगितलं, “या एका सीनला तुच पाहिजे म्हणून तुझ्यासाठी शिवाजी मंदिराला माणूस शोधायला पाठवला. याचा अर्थ यामध्ये काहीतरी असणार म्हणून तू कर.”

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

‘धमाल’ चित्रपटातील हा सीन गोव्यातला दाखवण्यात आला असला तरी तो प्रत्यक्षात पाचगणीला शूट झाला होता. या सीनसाठी विनय आपटे तिथल्या हॉटेलवर रात्री २ वाजता पोहोचले. त्यांना स्क्रिप्ट देऊन सकाळी ७ वाजता तयार राहण्यास सांगितलं. त्याप्रमाणे विनय आपटे लोकेशनला गेले. पहिलाच सीन त्यांचा होता आणि तो सीन त्यांनी वनटेकमध्ये केला. हे पाहून सगळे अक्षरशः वेडे झाले. एवढे कठीण डायलॉग असूनही एका टेकमध्ये कसा काय सीन दिला, हे आश्चर्य चकीत करणार होतं. पण नंतर विनय यांनी सेफ्टीसाठी आणखी एक सीन घ्याला सांगितला अन् मग ते ११ वाजता निघाले. ‘धमाल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विनय आपटेंचा सीन चांगलाच हिट झाला. त्यांना या सीनमुळे फोनच फोन यायला लागले. एकेका दिवशी १०० फोन यायचे.

दरम्यान रंगभूमी, रुपेरी पडद्यावर विनय आपटे नावाचं नाणं खणखणीत वाजत होतंच. टीव्ही मालिका क्षेत्रातही त्यांनी कमाल केली. ‘आभाळमाया’ ते ‘दुर्वा’पर्यंतच्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. एखादी भूमिका अत्यंत समरसून कशी करायला हवी? याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनय आपटे. अशा या बहुआयामी कलाकाराचा झंझावात ७ डिसेंबर २०१३ साली शांत झाला. शिमला येथे एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आपटे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मग त्यांना घरी पाठवण्यात आलं. पण यादरम्यान इतर अन्य आजार उफाळून आले आणि ७ डिसेंबर २०१३ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.