‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेता विराजस कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक असो किंवा मालिका त्याने अत्यंत कमी वयात दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विराजसने रंगभूमीची सुरुवात एकांकिका, प्रायोगिक नाटकांपासून करत कालांतराने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं.
आपली आई मृणाल कुलकर्णींच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. सध्या तो ‘गालिब’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे. याच नाटकाच्या निमित्ताने यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्याला अभिनेत्याने खास उपस्थिती लावली होती. यावेळी विराजसने नाटकादरम्यानचा खास किस्सा प्रेक्षकांबरोबर शेअर केला.
हेही वाचा : “पाच महिन्यांची गरोदर असताना…”, कविता मेढेकरांनी सांगितली भावुक आठवण; म्हणाल्या, “त्या प्रयोगानंतर खूप रडले”
विराजस म्हणाला, “माझ्या पहिल्या बालनाट्याच्या प्रयोगादरम्यानचा एक किस्सा आज मी सांगतोय. तेव्हा मी चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारत होतो. प्रायोगिक नाटकात कलाकारांनाच सेट आणावा लागतो, मीच सगळ्यांचे मेकअप करायचो आणि सगळी कामं करून आम्ही कसाबसा प्रयोग सुरू करायचो. एकदा काय झालं…आमच्या दिग्दर्शकाने संपूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकली की…सगळं तुम्ही मॅनेज करा मी थेट प्रयोगाच्यावेळी तुम्हाला येऊन भेटतो.”
हेही वाचा : जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”
अभिनेता पुढे म्हणाला, “बरोबर सहा वाजता प्रयोग होता आणि पावणेसहा वाजले तरी आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो नव्हतो. आता जर आपला सेट आला नाही हे दिग्दर्शकाला सांगितलं, तर तो खूप आरडाओरडा करेल हे आम्हाला माहिती होतं. सेटचं सामान प्रत्येकाकडे विखुरलेलं असायचं त्यामुळे संपूर्ण सेट यायला एक ते दीड तास जाणार हे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही काय केलं पहिल्या अंकाचा सेट आणून…हे बघ सेट आणलाय आपण प्रयोग सुरू करू असं त्याला खोटं सांगितलं. प्रयोग कसाबसा सुरू केला आणि माझी एन्ट्री बरोबर १० मिनिटांनी असायची. तेव्हा मला समजलं की, माझी पँटच आणायला आम्ही विसरलो होतो.”
हेही वाचा : प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
“चार्ली चॅप्लिनची भूमिका त्यात मी शॉर्ट्सवर आलो होतो आणि त्यात माझी एन्ट्री प्रेक्षकांमधून होती त्यामुळे माझं असं झालं….आता काही खरं नाही. आता अशीच एन्ट्री घ्यावी लागणार असा समज माझा झाला होता. मी प्रवेश घेण्यासाठी मागे उभा होतो तेवढ्यात माझा एक मित्र टू व्हिलरवरून माझी पँट घेऊन आला होता. माझ्या एन्ट्रीचं म्युझिक सुरू झालं…मी पँट घालत घालत स्टेजवर चढलो सगळी लोक खूप हसली आणि तो प्रयोग यशस्वी झाला. पण, तो प्रयोग पार पडल्यावर त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने नाटकाच्या आणि अशाप्रकारे होणाऱ्या फजितींच्या प्रेमात पडलो.” असं विराजसने सांगितलं.