विराजस कुलकर्णीने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपली आई मृणाल कुलकर्णींच्या पावलावर पाऊल ठेवत विराजस मनोरंजन विश्वाकडे वळला. ‘झी मराठी’वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे विराजस घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या अभिनेता रंगभूमीवर सक्रिय आहे.
विराजसच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाला यंदाच्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये बक्षीसरुपी कौतुकाची थाप मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. या नाटकाबद्दल सविस्तर पोस्ट लिहित विराजसने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या नाटकाला अभिनेत्याने बाळाची उपमा दिली आहे.
अभिनेता विराजस कुलकर्णीची पोस्ट
लेखक आपलं स्क्रिप्ट कलाकारांच्या स्वाधीन करतो तेव्हा, आपलं मूल दत्तक देत आहे अशी काहीशी भावना असते. तुमच्या संस्कारात वाढलेलं ते पोरगं आता त्याच्या नवीन आई बाबांबरोबर वावरायला लागतं… तुम्ही काढलेल्या चित्रात ते त्यांच्या पॅलेट मधले रंग भरणार असतात आणि मग ते नव्याने रंगवलेलं चित्र लोकांसमोर येणार असतं आणि त्या चित्रानुसार तुमचं मूळ Sketch कसं होतं ते ठरतं. त्यामुळे तुम्ही कुणाबरोबर Collaborate करता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात.
पण कधीतरी आकाशातले ग्रह तारे अशा पद्धतीने Align होतात की अत्यंत समविचारी, बऱ्यापैकी समवयस्क, आणि काही अर्थाने समदुःखी असे कलाकार, तंत्रज्ञ, सहकारी, आणि मित्र एकत्र येतात, आणि मग एक वेगळं बाळ जन्माला येतं… एक नवीन बाळ… एक Super बाळ.
असंच एक Super duper बाळ म्हणजे आमचं ‘वरवरचे वधू-वर…’ दोन तासात सुचलेलं, आणि पाच दिवसात लिहिलेलं हे बाळ आणि याचं पालन पोषण करणारे याचे दत्तक आई बाबा – सुव्रत जोशी आणि सखी गोखले… एकविसाव्या शतकातली अजरामर साहित्य कलाकृती देडपूल (इ.स. २०१६) यातली एक ओळ इथे आठवल्याशिवाय राहत नाही… “Your crazy matches my crazy”… या वाक्याला साजेशी ही crazy माणसं… लिहिताना मनात जी वाक्य ऐकू येतात त्यांना माझ्या कल्पनेपेक्षा विनोदी, माझ्या अपेक्षेपेक्षा संवेदनशील, आणि माझ्या अंदाजापेक्षा खूप खूप जास्त relatable करून कागदावरच्या ‘मिस्टर आणि मिसेस मोहित माने’ यांना खऱ्या अर्थाने जिवंत केलं.
फक्त उत्तम नाटक नाही, तर एक उत्तम theatre industry निर्माण व्हावी यासाठीचे प्रयत्न करणारा कलाकारखाना, त्याच बरोबर शांताईचे आमचे देवेंद्र राव sir, कलाकारखानाचे दोन भक्कम खांब जयंत आणि विनया गोडबोले, अत्यंत मन लावून नाटकाचा तांत्रिक भाग सांभाळणारी, आणि तेवढ्याच उत्साहाने reels मध्ये सहभाग घेणारी आमची संपूर्ण team यांच्या शिवायही हे चित्र पूर्ण झालं नसतं, हे super बाळ उडू शकलं नसतं.
मागची चौदा वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना अनेक घट्ट मित्र झाले आहेत. त्यांच्या बरोबर आयुष्यभर काम करायचं आहे. त्याचं पहिलं पाऊल या नाटकात सूरज पारसनीसला कास्ट करून टाकलं. एरवी दिग्दर्शक म्हणून मला नाचवणाऱ्या सूरजला अभिनेता म्हणून नाचवायचा, आणि त्याच्या खूप मोठ्या Professional कारकिर्दीची सुरुवात करण्याचा मान मिळाला. आता रंगभूमी त्याची आहे.
या अधिक कौतुक केलं तर सुव्रत-सखी रागावतील, पण बक्षिस लेखनाचं मिळालं आहे, So लिहिणं भाग होतं. Cheers.

दरम्यान, विराजसच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याचं व ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचं भरभरून कौतुक केलं आहे. फुलवा खामकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुव्रत आणि सखीने देखील या पोस्टवर कमेंट्स करत, “आपलं सुपर बाळ आता आता शंभर दिवसांचं होतंय, इथून पुढे धावेल असं पोषण चालू ठेवूया” असं म्हटलं आहे.