भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळालं. पण, बऱ्याच ठिकाणी ‘टीडीएम’ चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमचं म्हणणं आहे. नुकतंच एका थिएटरमध्ये चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रूही अनावर झाले. तो व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला.
यानंतर ठीकठिकाणी या चित्रपटाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर तर बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. पण या सगळ्या गोष्टीमुळे भाऊराव कऱ्हाडे यांनीच हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घ्यायचा निर्णय घेतला. याविषयी नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि त्यातील कलाकारांनी ‘दैनिक बोंबाबोंब’ या न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून त्यांच्यापुढे आता स्वतःचा जीव देण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : मृणाल ठाकूरचे नवीन फोटोशूट व्हायरल; बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले “ही आमची नॅशनल क्रश”
याबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, “हा सिनेमा बंद पडला तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. मी ३.५ कोटींचं कर्ज घेऊन हा सिनेमा केला आहे. बऱ्याच बँकांचं कर्ज आहे माझ्यावर, मी सगळी माहिती देतो. माझ्या घरातून पैसे टाकून हा सिनेमा केलेला नाही, एक एक रुपया जोडून आम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. अशी जर गळचेपी होत असेल तर हा एकप्रकारे कलाकारांचा खून आहे. आमची फक्त एकच माफक अपेक्षा आहे की, जे आमच्या वाट्याला यायचं आहे ते येऊ द्यावं.”
हे सगळं बोलताना या तीनही कलाकारांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. इतर चित्रपटांना १५० शो तर ‘TDM’ला केवळ २० शो दिल्याचं भाऊराव यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल चाहते पोस्ट टाकत आहेत. चित्रपट उत्तम आहे, पण शो मिळत नसल्याचंही सोशल मीडियावर बोललं जात आहे. कलाकारांचा थिएटरमधील व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.