ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख असलेल्या या अभिनेत्याचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. शुक्रवारी तळेगाव-दाभाडेजवळ आंबी गावातील राहत्या घरी ते मृतावस्थेत सापडले. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी महाजनींच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करून त्यांच्याबद्दलचा एक किस्सा लोकसत्ताबरोबर शेअर केला.
‘सतीची पुण्याई’ या चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा आहे. दिलीप ठाकूर यांनी सांगितलं की, ” ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी शेखर सावंत हे पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांना दरोडेखोरांचा सामना करायचा होता. कोल्हापूर येथे या सीनचं शूटिंग होतं. या सीनचं शूट सुरू होण्यापूर्वी महाजनी यांनी दिग्दर्शकाला बोलावून सांगितलं की, ‘या फायटिंगसाठी तू ज्यांना बोलावून घेतलं आहेस, त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड वगैरे अशी खरी हत्यारं देऊ नकोस. त्यांना फायटिंग जरा जपून करायला सांग.'”
हेही वाचा – घोरपड, साप हातात घेऊन मिसेस उपमुख्यमंत्री सांगतायत कोणता प्राणी सर्वात विषारी?; नेटकरी म्हणाले, “घरातच…”
“रवींद्र महाजनी यांनी दिग्दर्शकाला सूचना देऊनही प्रत्यक्षात मात्र त्यांना जी भीती वाटतं होती तेच घडलं. या सीनच्या टेकच्या वेळी रवींद्र महाजनींच्या हाताला कुऱ्हाड लागली आणि रक्तस्राव होऊ लागला. यामुळे ते शहारले. हा प्रसंग त्यांच्या जीवावरच बेतला होता. सुदैवानं त्याच्यातून ते निभावून गेले, पण फायटिंग सीन करताना समोरच्या फायटरला भान राहिलं नाही आणि विनाकारण महाजनी यांना मोठी जखम झाली होती.”
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री
दरम्यान, ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटात रवींद्र महाजनी यांच्याव्यतिरिक्त आशा भोसले, सुलोचना लाटकर, निळू फुले, लता अरुण, मधू कांबिकर, प्रकाश इनामदार असे बरेच कलाकार होते.