काही दिवसांपूर्वीच अभिनेता पृथ्वीक प्रतापने तो आडनाव का लावत नाही, याबद्दल खुलासा केला होता. प्रृथ्वीक प्रमाणेच मराठी इंडस्ट्रीत बरेच कलाकार आहेत, जे त्यांचं आडनाव न लावता वडिलांचं नाव लावतात. याच यादीतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष होय. मराठी नाटक व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता बॉलिवूडमध्येही काम करत आहे. ती ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची लेक आहे. अमृता नावामागे वडिलांचं नाव लावते. ती आडनाव का लावत नाही, याबद्दल जाणून घेऊया.
अमृता म्हणाली, “मला माझं आडनाव लावता येत नाही, हे माझं हळवं दुखणं आहे. माझं आडनाव ढेंबरे आहे. कुणीही माझं आडनाव आजपर्यंत बरोबर उच्चारलेलं नाही. कुणी ढगे म्हणतं, कुणी ढोले तर कुणी ढमढेरे म्हणतं. त्यामुळे मी आडनाव लावणं सोडून दिलंय. पण माझ्या नावाचं खरं सौंदर्य मोहन गोखले यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. अमृता या नावाप्रमाणेच तुझी वाणी आहे, असं ते म्हणाले होते,” अशी आठवण अमृता सुभाषने सांगितली.
दरम्यान, अनेक मराठी चित्रपट गाजवणारी अभिनेत्री अमृता सुभाष लवकरच ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये दिसणार आहे. तसेच तिच्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकाचे शो सुरू आहेत. अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या अभिनयाच्या प्रोजेक्टबद्दलही ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट्स देत असते.