मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाचा वेगळा ठसा उमवटणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते म्हणजे नागराज मंजुळे. नागराज मंजुळे यांनी कित्येक तरुण मंडळींना स्वतःच्या सिनेमात काम करण्याची संधी दिली. ज्यांचा अभिनय क्षेत्राशी काहीही संबंध नाही अशा सर्वसाधारण मुलांना नागराज मंजुळे यांनी एक वेगळी ओळख दिली. लवकरच त्यांचा ‘बापल्योक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानिमित्तानं ते सध्या प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच मंजुळे यांनी त्यांच्या कायदेशीर नावाचा खुलासा केला आहे.
आपण अनेक सिनेमांमध्ये नागराज पोपटराव मंजुळे असं त्याचं नाव वाचलं आहे. पण मंजुळे यांचं कायदेशीर नाव वेगळं आहे. याचा किस्सा नुकताच त्यांनी एका एंटरटेन्मेंट मीडियाला मुलाखत देताना सांगितला. ते म्हणाले की, “माझ्या मोठ्या चुलत्याला मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव बाबुराव आहे. त्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला मला दत्तक दिलं होतं, तेव्हापासून मी माझं नाव नागराज बाबुराव मंजुळे असंच लिहायचो. मी एकेदिवशी नियतकालिकेला माझी कविता पाठवली होती. कवितेच्या खाली माझं नाव नागराज मंजुळे असं लिहिलं होतं. तेव्हा त्यांना (पोपटराव मंजुळे) ते आवडलं नाही. त्यांनी सांगितलं, माझा मोठा भाऊ, जे तुझे वडील आहेत, त्याचं तू नाव लिहिलं पाहिजे. बाबुराव नाव नको काढू.”
“तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते त्यांच्या मोठ्या भावाचं नाव लावायला सांगतायत, ज्यांच्याकडे मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव टिकवावं म्हणून हे करतायत असं वाटलं. पण तेव्हापासून मी माझ्या कवितेला नागराज बाबुराव मंजुळे असं नाव लिहायला लागलो. परंतु, आयुष्यात दुसरं काही केलं तर नागराज पोपटराव मंजुळे असं नाव देणार हे माझं ठरलं होतं. हे सगळं करताना अपघातानं मी सिनेसृष्टीत आलो आणि मी माझ्या पहिल्या सिनेमापासून नागराज पोपराव मंजुळे असं नाव द्यायला लागलो,” असं मंजुळे म्हणाले.
हेही वाचा – ‘त्या’ फोटोमुळे भार्गवी चिरमुले झाली होती ट्रोल, नेटकरी म्हणाले होते “मरा सिगारेट पिऊन”
दरम्यान, नागराज मंजुळे यांचा ‘बापल्योक’ सिनेमा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.