‘सैराट’ या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘सैराट’च्या आर्ची-परश्याची प्रेमकहाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३० कोटींची कमाई केली होती. या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकूला घराघरांत लोकप्रियता मिळली आणि तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
रिंकूने ‘सैराट’नंतर ‘कागर’, ‘झुंड’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतु, आज घराघरांत लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरूचं खरं नाव फार कमी लोकांना ठाऊक आहे.
हेही वाचा : हळद लागली! आयरा खान – नुपूर शिखरेच्या लग्नविधींना सुरुवात, हळदी समारंभातील पहिला फोटो समोर
रिंकूने नववर्षानिमित्त नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. काही चाहत्यांनी “तुझं टोपणनाव काय आहे?” असा प्रश्न तिला विचारला यावर, अभिनेत्रीने “रिंकू…” असं उत्तर दिलं. साहजिकच टोपणनाव रिंकू आहे हे वाचून अनेकांना तिचं खरं नाव काय आहे? असा प्रश्न पडला.
अभिनेत्रीच्या एका चाहत्याने, “जर तुझं टोपणनाव रिंकू आहे, तर खरं नाव काय आहे?” असा प्रश्न तिला विचारला. यावर तिने प्रेरणा असं उत्तर दिलं. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. अभिनेत्रीच्या दहावीच्या निकालपत्रावर व शाळेच्या दाखल्यावर प्रेरणा हे तिचं खरं नाव नमूद केलेलं आहे.
अभिनेत्रीच्या घरचे बालपणापासून तिला रिंकू या नावाने हाक मारत असल्याने कालांतराने तिला मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शिक्षक सगळेच रिंकू म्हणू लागले. याशिवाय चित्रपटसृष्टीत सुद्धा प्रेरणा राजगुरू ही रिंकू या नावानेच लोकप्रिय आहे.