‘दुर्वा’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे होय. २०१७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘फुलपाखरू’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत होती. या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता मात्र अभिनेत्री तिच्या कामामुळे नाही तर तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे?
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने नुकतीच ‘द मोटर माऊथ शो’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे? त्यावर उत्तर देताना ऋताने म्हटले, “मला वाटते की नात्यात आदर असणे महत्त्वाचे आहे. प्रेम वगैरे ठीक आहे, ते होतं. पण, सन्मान खूप महत्त्वाचा आहे. जितके त्याला त्याच्या कामाप्रति आदर असेल, तितकाच मुलीच्या कामाप्रतिदेखील असायला हवा. याबरोबरच निर्णय घेण्याच्या बाबतीतसुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा काय वाटते हे महत्त्वाचे आहे. मुलीचे मतदेखील तितकेच महत्वाचे आहे.
या मुलाखतीत ऋता दुर्गुळे प्रतीकबरोबरच्या लग्नाबाबत, त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे. एक काळ असा होता की मला लग्न करायचे नव्हते. मात्र, प्रतीक आयुष्यात आल्यानंतर गोष्टी सोप्या झाल्या, असे तिने म्हटले आहे. याबरोबरच करिअर, सोशल मीडिया अशा गोष्टींबद्दलदेखील तिने वक्तव्य केले आहे.
हेही वाचा: Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या समोर अचानक आला मद्यपी अन् मग…; पाहा व्हिडीओ
दरम्यान, ऋताने २०२२ मध्ये प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली आहे. प्रतीक शाह दिग्दर्शक आहे. मालिकांबरोबरच अभिनेत्री मराठी चित्रपटांमध्येदेखील दिसली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला ‘अनन्या’ या चित्रपटाची विशेष चर्चा झाली. ‘टाइमपास ३’मध्येदेखील ती दिसली होती. याबरोबरच ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचीदेखील मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. नुकतीच ती ‘कमांडर करण सक्सेना’ या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसली आहे. गुरमित चौधरी हा अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे. या वेब सीरीजमधील तिच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे.