आज मराठी चित्रपट आज ५० कोटी अन् १०० कोटींच्या घरात कमाई करू लागला आहे. ‘सैराट’सारख्या चित्रपटाने मराठी कलाकारांना तो एक आत्मविश्वास दिला. याबरोबरच मराठी चित्रपट हा आशयघन असतो असंही म्हंटलं जातं. अशाच एका आशयघन चित्रपटामुळे मराठी चित्रपटाने कात टाकली तो म्हणजे २००४ साली प्रदर्शित झालेला ‘श्वास’ हा चित्रपटाने. राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्करवारी अशा सगळ्याच स्तरातून या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं.
प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः उचलून धरला. चित्रपटात अमृता सुभाष, अरुण नलावडे, संदीप कुलकर्णीसारखे नामवंत कलाकार होते. यांच्याबरोबरीनेच कौतुक झालं ते यातील बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अश्विन चितळेचं. अगदी लहानपणातच त्याला या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली, ठीकठिकाणी या चित्रपटाचं आणि त्यातील अश्विनच्या कामाचं कौतुक होऊ लागलं. एवढं होऊनही नंतर मात्र अश्विन चित्रपटात फारसा दिसला नाही.
आणखी वाचा : सलमान खानच्या ‘टायगर ३’ची कथा झाली लीक; ‘या’ मिशनसाठी टायगर व झोया असतील सज्ज
नुकतंच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये अश्विनने हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये श्वासनंतर १६ चित्रपट करूनही अश्विनचं मन या क्षेत्रात फारसं रमलं नाही, त्यानंतर त्याने काय केलं? त्याने नेमकं कोणत्या क्षेत्रातील शिक्षण घेतलं अन सध्या तो काय करतो? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं या पॉडकास्टमध्ये त्याने दिली. याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
‘श्वास’नंतर कुठे होतास यावर उत्तर देताना अश्विन म्हणाला, “श्वासनंत मी १६ चित्रपट केले, पण १२ वीनंतर मला जसे चित्रपट अपेक्षित होते त्याऐवजी टिपिकल रोमॅंटिक लव्ह स्टोरीच्या ऑफर्स मला यायला लागल्या. मला तसे चित्रपट करायचे नव्हते त्यामुळे मी यातून बाहेर यायचं ठरवलं. श्वासमध्ये जे मी काम केलं ते माझ्याकडून करवून घेतलं, त्याचं संपूर्ण श्रेय हे दिग्दर्शकांनाच जातं. घरच्यांनीसुद्धा मला यात फार मदत केली, शिक्षणाला पहिले प्राधान्य द्यायचं हे ठरलेलंच होतं. श्वासमुळे प्रसिद्धीची एक नकारात्मक बाजू पाहिली. सुदैवाने त्याचा माझ्यावर वाईट परिणाम झाला नाही.”
याच मुलाखतीमध्ये नंतर अश्विनने शिक्षण कशात घेतलं याचा खुलासा केला आहे. चित्रपटापासून वेगळं झाल्यानंतर अश्विनने पुण्याच्या कॉलेजमधून इंडोलॉजी नावाचा एक कोर्स केला. या कोर्सच्या माध्यमातून भारतीय उपखंडातील मानवाच्या उत्पत्तीपासून १२ व्या शतकापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा, भाषांचा अभ्यास अश्विनने केला अन् त्यात मास्टर्स डिग्री मिळवली. याबरोबरच भाषा शिकायची प्रचंड आवड असल्याने अश्विनने नंतर फारसी आणि उर्दू भाषेवरही चांगलंच प्रभुत्व मिळवलं.
सध्या अश्विन सूफी कवी रुमी आणि गालिब यांच्या गझलांवर छोटे कार्यक्रम सादर करतो ज्याची चांगलीच चर्चा आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी यांनीही मध्यंतरी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अश्विनच्या अभ्यासाचं अन् त्याच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं कौतुक केलं होतं.