सचिन श्रीराम दिग्दर्शित ‘टेरिटरी’ सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. या सिनेमात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारकी कहाणी ‘टेरिटरी’ सिनेमात दाखवण्यात आली आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने अलीकडेच संदीप कुलकर्णी यांनी ‘प्लॅनेट मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मराठी लोकांमध्ये एकी पाहिजे, असं वक्तव्य केलं. पण संदीप कुलकर्णी असं का म्हणाले? जाणून घ्या.
हेही वाचा – “लता दीदी आणि आशाताई यातलं कोण ग्रेट?” विजू मानेंनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
मुलाखतीमध्ये संदीप कुलकर्णी यांना विचारण्यात आलं होतं की, “गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमे कोट्यवधींची कमाई करत आहेत. पण कुठेतरी एखादा हिंदी सिनेमा येतो, तमिळ किंवा तेलुगू सिनेमा येतो, तेव्हा मराठी सिनेमाची तारीख बदलून पळवाट शोधावी लागते किंवा सिनेमाचे प्रदर्शन थांबवावे लागते. तसेच हव्या तशा स्क्रिन मिळत नाही. १ सप्टेंबरला ‘बापल्योक’, ‘बापमाणूस’, ‘टेरिटरी’ सारखे सिनेमे प्रदर्शित झाले आणि त्यात ७ तारखेला ‘जवान’ प्रदर्शित झाला. तर या स्पर्धा कुठेतरी सामंजस्याने निर्मात्यांनी एकत्र येऊन टाळता येतील का? जेणेकरून आपल्या प्रत्येक मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळेल आणि प्रेक्षकांपर्यंत आपला सिनेमा पोहोचू शकेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं?’
यावर संदीप कुलकर्णी स्पष्ट म्हणाले की, “पहिली ही गोष्ट आपल्याला माहितीच पाहिजे की, बॉलीवूड आणि मराठी सिनेमा कोएग्जस्टिट होतो. तुम्ही बॉलीवूड डिस्कार्ड करू शकत नाही. कारण बॉलीवूडचा प्रवास बऱ्याच वर्षांपासून आहे. मराठी सिनेसृष्टीचा तर आहेच. पण ही गुंतागुंत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाही. दाक्षिणात्यमध्ये त्यांच्या भाषेतील लोकं मनापासून सिनेमे बघतात आणि तिथे हिंदी फार पोहोचत नाही. यावर त्यांची खूप घट्ट पकड आहे. बॉलीवूड हे परक नाहीच आहे, आपल्या मधलंच आहे. अगदी लहानपणापासून आपण बॉलीवूडचे सिनेमे पाहतोय. आता मुद्दा हा येतो की, ही गुंतागुंत सोडवायची कशी? याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मराठी लोकांमध्ये एकी पाहिजे किंवा एक सामंजस्य पाहिजे की, आपण एकमेकांना मारू नये. एकमेकांना उलट पाठिंबा कसा द्यायचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जे दाक्षिणात्यमध्ये खूप आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांना पाठिंबा खूप भयंकर प्रकारे दिला जातो. असं आपल्यामध्ये व्हायला पाहिजे.”