सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही खळबळ उडाली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्या या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात नितीन देसाई यांनी दाढी वाढवली होती. त्यांच्या या ‘लूक’ची जोरदार चर्चा झाली होती. पण, या लूकमागचे नेमके कारण काय होते? हे त्यांनी स्वतः स्पष्ट केले होते.
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात नितीन देसाईंनी बदललेल्या लूकविषयी सांगितले होते. त्या वेळेस त्यांना विचारले गेले होते, ‘तुमच्या बदलल्या रूपड्याचा सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. ही काय भानगड आहे? तुम्ही अशी दाढी का वाढवताय? तुम्ही नवस वगैरे केला आहे का? नरेंद्र मोदी यांचं अनुकरण म्हणून करताय का? किंवा बाबुराव पेंटर यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे करताय का? आणि हे सगळं आताच का करताय?’
या प्रश्नावर नितीन देसाई म्हणाले होते, “काहीतरी आयुष्यात करत राहायचं हा ध्यास असल्यामुळे मी जेव्हा काहीच करू शकत नाहीये. आपल्याला लॉकडाऊनने थोपलं गेलेलं आहे आणि घरात आहे. तेव्हा मग मी काय केलं? माझे सगळे श्याम बेनेगल यांच्यापासून जेवढे दिग्दर्शक होते, त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर बोलता बोलता स्वतःला हरवून गेलो आणि माझी दाढी वाढली. दाढी वाढल्यानंतर माझा मुलगा म्हणाला की, बाबा मला दाढी येत नाही; पण तुम्हाला आलीये. छान वाटतेय.”
“नंतर मी दाढी ठेवली. मी कुठलाही नवस किंवा तप केलेलं नाही. मी काम करून विश्व निर्माण करणारा माणूस आहे,” असं नितीन देसाई म्हणाले होते.