ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील राहत्या घरात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं. ते कुटुंबापासून वेगळे एकटेच तिथे राहायचे, तसेच शेजारच्यांशी त्यांचा संपर्क नव्हता, त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल उशिरा माहिती समोर आली होती. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची खूप चर्चा झाली.
प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा
रवींद्र महाजनींचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनानंतर प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. गश्मीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवतो. या सेशनच्या माध्यमातून तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. शुक्रवारी त्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याला एका युजरने वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर गश्मीर काय म्हणाला, पाहुयात.
“वडील वारल्यावर केस कापतात, याबद्दल काय बोलाल? मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल”, असा प्रश्न युजरने विचारला होता. त्यावर गश्मीर म्हणाला, “मी जे कार्य करतो, त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थार्जन होते. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?”
यावेळी एका चाहत्याने कुणाच्याही यशामागे व अपयशामागे काय कारण असतं, असा प्रश्न विचारला त्यावर गश्मीरने कठोर परिश्रम आणि आळशीपणा असं उत्तर दिलं.