गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून अलका कुबल-आठल्ये यांना ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील एक काळ त्यांनी चांगलाच गाजवला. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली. अलका कुबल यांनी मराठी मालिका, नाटक, चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम केले. पण त्यांनी याच काळात अनेक हिंदी चित्रपट नाकारले. नुकतंच त्यामागचे कारण समोर आलं आहे.
अलका कुबल हे नाव घेतलं तरी ‘माहरेची साडी’ हा चित्रपट आठवतो. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक म्हणून हा चित्रपट ओळखला जातो. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. ९०च्या दशकातील या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठत इतिहास लिहिला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे. माहेरची साडी या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने अलका कुबल यांना ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळाली.
आणखी वाचा : “माहेरची साडी चित्रपटावेळी आम्ही…” अलका कुबल यांनी सांगितली विक्रम गोखलेंची आठवण
प्रत्येक कलाकाराला हिंदी सिनेसृष्टीविषयी कौतुक असते. एकदा गप्पांच्या ओघात अलका कुबल यांना ललिता ताम्हणे यांनी हिंदी चित्रपटांबद्दल विचारले होते. तुला हिंदी चित्रपटात काम करावंसं वाटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ललिता ताम्हणे यांनी ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
“माहेरची साडी या चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. पण या सर्वांना मी ठाम नकार दिला होता. मी धार नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात ती भूमिका फारच महत्त्वाची होती.
या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या एका सहकलाकाराच्या ओळखीने आल्यामुळे नाइलाजाने मी तो चित्रपट केला होता. अनेकदा एखादी भूमिका स्वीकारताना मी त्याची लांबी बघत नाही. मी त्या चित्रपटात माझी भूमिका किती महत्त्वाची आहे आणि त्या भूमिकेत मला अभिनयाला किती वाव आहे, या गोष्टींचा अधिक विचार करते.” असे अलका कुबल यांनी सांगितले.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
“पण हिंदी चित्रपटासाठी वाट्टेल तसे ड्रेस घालण्याची आणि शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती. तसेच हिंदी चित्रपटात उगाचच छोटे पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात ‘नायिका’ म्हणून मध्यवर्ती भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का?” असेही त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या.
“मी एकदा दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या ‘नया ज़हर’ नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. पण तो चित्रपट अजिबात चालला नाही. तो चित्रपट कधी आला आणि गेला, हेसुद्धा कोणाला कळलं नाही. त्यामुळे अशा भूमिका करून काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे मी तेव्हापासून ठरवलं की हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत”, असेही अलका कुबल यांनी म्हटले.