‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘ठरलं तर मग’, तसेच ‘बिग बॉस मराठी’ अशा मालिका व टीव्ही रिअॅलिटी शोसाठी मीरा जगन्नाथ( Mira Jagannath)ओळखली जाते. आता ती चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहे. अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. आता नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल वक्तव्य केले आहे.
अभिनेत्री मीरा जगन्नाथने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसिक शांतता कशी जपतेस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “आधी मला काही गोष्टींचा त्रास व्हायचा; पण आता मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघते. एक छान गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली किंवा एक छान व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली की, आपोआप तुमच्या आयुष्यात सगळं छान होतं. मला यावर या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये खूप विश्वास बसलाय. त्यामुळे तुम्ही आपोआप सकारात्मक होता. तुम्ही नकारात्मक लोकांपासून दूर राहा. मग ती तुमच्या कुटुंबातील असो किंवा बाहेरची असो. जी व्यक्ती तुम्हाला खूप छान वाटते, ज्याच्याबरोबर तुम्ही बोलल्याने चांगलं होतं. भले ती तुमची आई, वडील, बहीण, नवरा किंवा बॉयफ्रेंड असेल, असे लोक तुमच्या आयुष्यात असू द्या.”
पुढे अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल खुलासा केला. मीरा जगन्नाथ म्हणाली, “एप्रिलमध्ये दोन इव्हेंट्स करीत आहे. जून-जुलैमध्ये आमचा येरे येरे पैसा ३ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यानंतर अजून दोन चित्रपट आहेत. एक नोव्हेंबरमध्ये आहे आणि एक जुलैमध्ये शो सुरू होणार आहे. आता मी कामाच्या संख्येपेक्षा गुणवत्तेवर लक्ष देत आहे.
मला सहानुभूती…
२०२५ नुकतंच सुरू झालं असून या वर्षासाठी काही स्वत:साठी ठरवलं होतं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मीरा म्हणाली, “कामावर लक्ष द्यायचं, कुटुंबाला वेळ द्यायचा. याबरोबरच, स्वत: आतून मनातून खूप खूश राहायचं, असं मी ठरवलं आहे. कारण- तुम्ही खूश असाल, तर सगळं आपोआप छान होईल. कारण- माझी दोन वर्षं रडण्यात, डिप्रेशनमध्ये गेली. मी कधी कोणाला याबद्दल बोलले नाहीये. कारण- प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्रास असतो. एक तर मी कोणाला सांगायचे नाही. कारण- मला सहानुभूती हा प्रकार आवडत नाही. घरच्यांना सांगितलं, तर त्यांना टेन्शन येणार. मग मला सायकॅट्रिस्टकडे जायला लागले. कुठे तरी आपल्याला हे बाहेर काढायला लागेल, असं वाटलं. तुम्ही काहीच करत नाहीय, चार-चार दिवस बेडवर पडलाय, टीव्ही बघताय, तिथेच बसून खाताय, टाकताय. तर मला स्वत:ची लाज वाटली की, हे मी चुकीचं करत आहे. ज्या दिवशी मी ठरवलं, त्या दिवशी मी उठले आणि विचार केला की, आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी आता हे करायचं नाही. त्यानंतर हळूहळू कामं यायला लागली आणि त्या कामातून सकारात्मक विचार करीत तुम्ही पुढे जाता. पण, त्या दोन वर्षांत जे होते, तेवढे वाईट दिवस मी आयुष्यात कधी पाहिले नव्हते. कारण- जेव्हा लोक तुमच्याबद्दल खूप वाईट बोलतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. तसं वाईट बोलणं माझ्याबद्दल बोलणं चालू झालं होतं. एक तर कोणी माझ्या मित्र-मैत्रिणी नाहीत. मी कोणाबरोबर वेळ घालवत नाही. पण, तरीही तुमच्याबद्दल वाईट बोलतात. त्यामुळे मी विचार केला की, मी माझं काम करेन, मजा करेन व तशी राहीन”, असे म्हणत अभिनेत्रीने मानसिक आरोग्याबद्दल बोलणे, काळजी घेणे गरजेचे असल्याचे म्हटले.
दरम्यान, अभिनेत्री नुकतीच ‘इलू इलू १९९८’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच ती ‘ये रे येरे पैसा ३’मध्ये दिसणार आहे.