प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बूम’ नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, वनिता खरात, प्रसाद शिवलकर, रोहित माने आणि स्वतः प्रसाद खांडेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात नम्रता संभेरावचा कॅमिओदेखील आहे. या कॅमिओमागचा गंमतीशीर किस्सा नम्रताने सांगितला.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील नुकतंच पहिलं गाणं प्रदर्शित झालं. यानिमित्ताने एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नम्रता संभेरावने ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील अवघ्या चार वाक्यांच्या स्वतःच्या कॅमिओबद्दल सांगितलं.
नम्रता संभेराव म्हणाली की, ‘जेव्हा प्रसादच्या डोक्यात ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाबद्दल सुचलं तेव्हापासून मी त्याच्याबरोबर आहे. मला या गोष्टीचं थोडं वाईटही वाटतं आणि चांगलं पण वाटतंय. ‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी माझं ऑलरेडी कास्टिंग झालं होतं, त्याचं शूटिंग सुरू होणार होतं, त्यादरम्यान या चित्रपटाबद्दल प्रसादच्या डोक्यात विचार आला. नेमकं त्या क्लॅशमुळे मला या चित्रपटाचं भाग होता आलं नाही. पण, मला हे सांगायला आवडेल या चित्रपटातलं माझं कास्टिंग मीच केलंय. अत्यंत महत्त्वाचं हे कास्टिंग आहे.”
पुढे नम्रता संभेराव म्हणाली, “आम्ही असंच प्रवासाला निघालो होतो, तेव्हा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात मला कसं घेता येईल? याची चर्चा सुरू होती. आमचा लेखक, सहकलाकार प्रथमेश शिवलकर तो म्हणाला, ताई मला पाच मिनिटं दे. आपण या चित्रपटात तुझ्यासाठी काहीतरी करुया. कारण माझ्याकडे दिवसचं नव्हते. अगदी एखादं, दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या चित्रपटासाठी काम करायचं होतं. कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत, तर मला या चित्रपटाच भाग व्हायचं होतं. काही का असेना. मला पासिंगचा रोल मिळाला असता तरी तो मी केला असता. त्यावेळी प्रथमेश पाच मिनिट दे म्हटला आणि तीन तास उठलाच नाही. तो झोपून राहिला. पण, चित्रपटाची गोष्ट मला माहीत असल्यामुळे मी म्हटलं राहू देत तुम्ही काहीही करू नका. माझं कास्टिंग मी करते. चित्रपटात जी शेवटची एन्ट्री आहे ती मी घेते, असं करून माझं कास्टिंग ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटासाठी मीच केलं आहे.
“‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे. अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे. ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते. तर आता मी वेगळं काम केलं आहे, जे चार वाक्यात संपणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. प्रसादचे मला मनापासून आभार मानायचे आहेत,” असं नम्रता संभेराव म्हणाली.
दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाबरोबर चित्रपट, नाटकात काम करत आहे. तिचं सध्या ‘थेट तुमच्या घरातून’ नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या चित्रपटात नम्रतासह प्रसाद खांडेकर, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई पाहायला मिळत आहेत.