मनोरंजन विश्वाच्या झगमगत्या ग्लॅमरमध्ये अलीकडच्या काळात रंगभूमीशी नाळ जोडलेले कलाकार क्वचितच पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी असंच एक नाटक रंगभूमीवर आलं अन् दोन तास प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या ‘अनन्या’च्या भूमिकेने प्रत्येकालाच भुरळ घातली. एमडी महाविद्यालयापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता थेट ‘लंडन’पर्यंत जाऊन पोहोचला आहे. नाटकाशिवाय मालिका असो किंवा चित्रपट ती प्रत्येक माध्यमांत रमली पण, शेवटी कामाची पोचपावती तिला रंगभूमीवरच मिळाली. अशी ही ‘हिरोइन’च्या चौकटी मोडून सामान्य प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. महाविद्यालयीन जीवनात एकूण २२ एकांकिका यानंतर ‘गोची प्रेमाची’, ‘गिरगाव व्हाया दादर’ ते ‘अनन्या’ या रंगभूमीवरच्या अतुलनीय कामगिरीसाठी तिला नुकताच संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा जाहीर करण्यात आला. पुरस्कार अन् महिला दिनाचं औचित्य साधून ऋतुजाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी अनेक विषयांवर गप्पा मारल्या…
रेकॉर्डब्रेक पुरस्कार अन् प्रेक्षकांचं प्रेम! अनन्याने खूप काही दिलं…
रंगभूमीवरच्या माझ्या एकूण कारकिर्दीसाठी मला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय याचा आनंदच आहे. पण, या सगळ्यात ‘अनन्या’चा खूप मोठा वाटा आहे. त्या नाटकाने मला खूप काही दिलं. प्रेक्षकांचं प्रेम, अनेक पुरस्कार अगदी सर्वकाही…एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते आणि अर्थात मनात आता फक्त कृतज्ञतेची भावना आहे.
नाटक अन् रंगभूमीशी एक वेगळं नातं
मला नाटक अगदी लहानपणापासून आवडतं. मी खूप आधीपासून नाटकात काम करतेय. त्यामुळे नाटकाशी माझं एक वेगळं नातं आहे. आईच्या कुशीत झोपल्यावर जे समाधान मिळतं. तेच समाधान मला रंगभूमीवर काम करताना मिळतं. त्यामुळेच नाटक हा माझ्या करिअरमधील एक अविभाज्य घटक आहे. इतर गोष्टींबद्दलही तेवढंच प्रेम आहे पण, नाटक केल्याचं समाधान सर्वाधिक आहे. मालिका केल्यानंतर मी एका चांगल्या नाटकाची वाट पाहत होते. अशातच ‘अनन्या’ माझ्या वाट्याला आलं.
पूर्णवेळ नाटकात काम करणं आर्थिकदृष्ट्या किती सोयीचं?
माझं पैशांच्या बाबतीत नेहमीच योग्य नियोजन असतं. मी खूप वर्षे इंडस्ट्रीत काम केलं असल्याने रंगभूमीत काम साकारताना मला व्यवस्थित मानधन मिळत होतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मला कधीच त्रास झाला नाही. माझं काहीसं उलट आहे… नाटकाची दीड महिन्यांची तालीम संपली की, दिवसातील फक्त चार तास तुम्हाला द्यावे लागतात. बाकी, संपूर्ण दिवस तुम्हाला रिकामा मिळतो त्यात मी माझं स्वत:चं बरंच काही करू शकते. त्यामुळे नाटकात काम करणं हे माझ्यासाठी आर्थिकदृष्ट्या अगदीच सोयीचं होतं.
नाटकाकडे आकर्षित होणारी तरुणपिढी
समाजातील चित्र हळुहळू बदलू लागलंय कारण अलीकडची तरुणपिढी आता स्वत:हून नाटकाकडे वळतेय. महाविद्यालयीन मुलं-मुली नाटकाकडे वळण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्याचे विषय. आता रंगभूमीवर खूप वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात येत आहेत. याशिवाय तरुण फळीतील अनेक कलाकार स्वत: पुढाकार घेऊन नाटकाकडे वळत असल्याचं आपण पाहतोय. पूर्वी कसं व्हायचं काही नाटकांचे विषय गंभीर असल्याने अनेकदा तरुणपिढी त्या आशयाला रिलेट करू शकत नव्हती. पण, आता नाटकात काम करणारी पिढी जशी यंग आहे तसेच आताच्या नाटकाचे विषय देखील यंग आहेत. चित्र बऱ्यापैकी बदलतंय.
‘तिकिटालय’च्या निमित्ताने मराठी पाऊल पडते पुढे!
‘तिकिटालय’ या प्रशांत दामलेंनी सुरू केलेल्या नव्या ॲपच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नाटकाशी कनेक्ट राहणं खूप सोपं जाईल. इतर ॲप्समध्ये हिंदी किंवा इंग्रजी नाटकांविषयी माहिती मिळते. पण, ‘तिकिटालय’ संपूर्णपणे मराठीत असल्याने हे आपल्या प्रेक्षकांसाठी हक्काचं व्यासपीठ असणार आहे. ही मराठी रंगभूमीच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या मराठीत नवीन काहीतरी येतंय तर, त्याला मोठं करणं ही आपल्या प्रेक्षकांची जबाबदारी आहे.
नाट्यगृहांच्या दुरवस्थेची कायमच खंत
आजवर सगळ्याच कलाकारांनी नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दल अनेकदा खंत व्यक्त केली आहे. हा खूप मोठा विषय असल्याने या समस्येकडे आता सगळेच कलाकार अतिशय बारकाईने पाहू लागले आहेत. अनेक नाट्यगृहांमध्ये आता सुधारणा देखील दिसू लागल्या आहेत. सध्या मुंबई-पुण्यासारख्या शहरातील नाट्यगृह उत्तम परिस्थितीत आहेत. पण, मूळ प्रश्न हा शहराबाहेरच्या नाट्यगृहांचा आहे. गावाकडच्या भागात ती दुरावस्था आजही पाहायला मिळते. आम्ही प्रत्येक कलाकार वेळोवेळी याविषयी बोलतोच आता हे बदल केव्हा अमलात आणले जातील हे सर्वस्वी संबंधित थिएटर मालकांच्या हातात आहे.
‘अनन्या’ चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, पण…
‘अनन्या’ नाटकाचा जेव्हा रुपेरी पडद्यासाठी विचार करण्यात आला तेव्हा त्या चित्रपटासाठी मी ऑडिशन दिली होती. पण, काही कारणास्तव त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नाटकातील कलाकारांना नकार दिला. त्यांना नाटकातील कलाकार नको होते. त्यामुळे मला असं वाटतं की, ‘अनन्या’ नाटकासाठी मी माझे शंभर टक्के दिले होते. त्या नाटकाने देखील मला भरभरून दिलं. शेवटी चित्रपट हा संपूर्णपणे वेगळा प्रोजेक्ट आहे असा विचार मी केला.
ड्रीम रोल…
मला भविष्यात सगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. कलाकार हा भुकेला असतो आणि प्रत्येक कलाकाराने नेहमी असंच असलं पाहिजे. माझ्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका ही माझ्यासाठी ड्रीम रोल असते. माझी प्रत्येक भूमिका मी मनापासून करण्याचा नेहमीच प्रयत्न करते.
महिला दिनानिमित्त मुलींना खास सल्ला…
आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करा, मानसिकदृष्ट्या असो किंवा आर्थिक नेहमी स्वतंत्रपणे विचार करा. आपण कोणावर फार अवलंबून राहायला नको यासाठी प्रत्येक मुलगी सक्षम असणं आवश्यक आहे. आता समाजात सक्षम होण्यासाठी काय केलं पाहिजे याचा प्रत्येक मुलीने विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक मुलीला करिअर आणि घर या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला पाहिजे. या दोघांमधला सुवर्णमध्य प्रत्येकीने साधायला हवा.