दिवाळी भाऊबीजेच्या मुहूर्तावर न्यूझीलंड संघाचा ७० धावांनी पराभव करत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता १९ नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. २००३ च्या विश्वचषकानंतर आता पुन्हा एकदा तब्बल २० वर्षांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसमाने येणार आहेत. यापूर्वी २००३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा तब्बल २० वर्षांनी टीम इंडियाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आता या अंतिम सामन्याबाबत सिनेविश्वातील कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘झिम्मा २’ फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकत्याच रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत आपलं मत मांडलं आहे.
हेही वाचा : Video : ट्रॅफिकमध्ये अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले…
“टीम इंडियाकडून माझी एवढीच इच्छा आहे की, त्या ऑस्ट्रेलियाची अशी चेचा (वाट लावा) ना…२००३ चा बदला आपण काही केल्या घेतला पाहिजे! ऑस्ट्रेलियाची टीम पुन्हा भारतात आली नाही तरी हरकत नाही. त्यांना एकदाच धुड्डूssम करून टाका. ऑस्ट्रेलियाची टीम अंतिम सामन्यात दाखल झाली याचा खरंतर मला प्रचंड आनंद आहे. त्यांची टीम खरंच टफ आहे यात काही शंका नाही. पण, सध्या आपली टीम खूपच भारी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाला हरवलंच पाहिजे.” अशी इच्छा सिद्धार्थ चांदेकरने व्यक्त केली आहे.
हेही वाचा : “यंदाचा वर्ल्डकप…”, ‘टायगर ३’ चित्रपटाच्या कार्यक्रमात सलमान खानचे भाकित, म्हणाला…
सिद्धार्थ चांदेकरप्रमाणे गायक सलील कुलकर्णी, झिम्माचा दिग्दर्शक हेमंत ढोमे, गौरव मालनकर, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सायली संजीव, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांनी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.