Zapuk Zupuk box office collection day 1 : रीलस्टार व ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता अभिनेता झाला आहे. सूरजचा पदार्पणाचा चित्रपट ‘झापुक झुपूक’ शुक्रवारी (२५ एप्रिल रोजी) रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.

मागील अनेक दिवसांपासून सूरजची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. त्यामुळे ‘झापुक झुपूक’ बॉक्स ऑफिसवर कशी ओपनिंग करणार याकडे चाहत्यांचा लक्ष लागलं होतं. आता ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. सिनेमाने संथ सुरुवात केली आहे.

‘झापुक झुपूक’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ ने भारतात पहिल्या दिवशी २४ लाख रुपयांचा गल्ला जमवला. तसेज जगभरातील कमाई २७ लाख रुपये आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने कलेक्शनमध्ये वाढ झाल्यास वीकेंडची कमाई १ कोटींचा टप्पा गाठू शकते.

‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे. सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ आनंदाची मेजवानी घेऊन आलाय. रोमांस, अॅक्शन , ड्रामा या सर्व गोष्टी सिनेमात पाहायला मिळतात. सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमाकेदार डायलॉग्सही यामध्ये आहेत. या चित्रपटात सूरज आणि जुई भागवतची जोडी आहे.

‘झापुक झुपूक’मधील कलाकार

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.

दरम्यान, ‘झापुक झुपूक’चा दमदार ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला होता. अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला होता.